
मुंबईमध्ये 16 आणि 17 मे रोजी वादळी वारा आणि ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये हा पाऊस पडेल. तसेच राज्याच्या अनेक भागांमध्येही वादळी पावसाचा जोर राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मान्सून या वर्षी वेळेआधीच दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला होता. हा अंदाज खरा ठरवत मान्सूनची वाटचाल सुरू झाली आहे. यातच राज्याच्या विविध भागांत मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रातील काही जिह्यांमध्ये काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह सरी बरसल्या. मुंबईतही मागील आठवड्यात जोरदार पाऊस झाला. तर आता पुढील दोन दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यामध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
मान्सून आला रे आला
मान्सून वेळेआधीच अंदमानमध्ये डेरेदाखल झाला असून अरबी समुद्रासह मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागातून पुढे सरकला आहे. हा मान्सून 27 मेपर्यंत केरळ तर 7 जूनपर्यंत महाराष्ट्रात येणार आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांच्या कामांनाही वेग येणार आहे.
मध्य महाराष्ट्र, नाशिक, मराठवाड्यासह अनेक भागांत सध्या जोरदार पाऊस पडत आहे. मुंबई शहर आणि उपनगरातही पुढील दोन दिवस गडगडाट आणि विजांसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे, असे मुंबई हवामान विभागाच्या सुषमा नायर यांनी सांगितले.