
हिंदुस्थान-पाकिस्तानदरम्यान गेल्या काही दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती असतानाच आज दुपारच्या सुमारास शहापूर तालुक्यातील फुगाळे गावात डोंगरावरील झाडावर अचानक ड्रोन कोसळला. त्यामुळे एकच घबराट उडाली असून पोलिसांनी हा ड्रोन ताब्यात घेतला आहे. या घटनेमुळे शहापूर तालुक्यात अफवांचे पीक उठले. तसेच भीतीही निर्माण झाली. मात्र हा ड्रोन सर्वेक्षणासाठी पायोनिअर इन्फ्रा या ठेकेदार कंपनीने उडवल्याची माहिती मिळताच स्थानिक गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
फुगाळे तेथील आघानवाडीच्या डोंगरावर काही लहान मुले खेळत होती. त्यावेळी अचानक आकाशातून मोठा आवाज करीत आणि घिरट्या घेत विमानाच्या आकाराचा ड्रोन झाडावर आदळला. या घटनेमुळे खेळण्यात गर्क असलेली मुले प्रचंड घाबरली आणि जीवाच्या आकांताने पळू लागली. मात्र काही धाडसी मुलांनी हा ड्रोन झाडावरून खाली उतरवला व डोंगराच्या पायथ्याशी आणला. तसेच ही बाब सरपंच जीवा भला यांना समजताच त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले.
फुगाळे गावात दाखल झाले आणि तातडीने ड्रोन ताब्यात घेतला. अधिक चौकशी केली असता हा ड्रोन पायोनिअर इन्फ्रा या ठेकेदार कंपनीचा असल्याचे आढळून आले. जलसंपदा विभागाने वाडा तालुक्यात ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा ठेका या कंपनीला दिला होता. त्यानुसार सर्वेक्षण सुरू असताना वाऱ्यामुळे ड्रोनची दिशा भरकटली आणि तो एका झाडावर जाऊन पडला.
धरणाच्या सर्वेक्षणासाठी संपूर्ण हिंदुस्थानात अजूनही हिंदुस्थान-पाकिस्तान दरम्यानच्या युद्धजन्य परिस्थितीच्या बातम्या धडकत असतानाच शहापूरच्या फुगाळे गावात ड्रोन पडल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. हा ड्रोन नेमका कुठून आला, कोणाचा आहे असे तर्कवितर्क केले जात होते. वाडा तालुक्यात होऊ घातलेल्या धरणाच्या कामासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू होते. मात्र हा ड्रोन फुगाळे गावात कोसळल्याने ग्रामस्थच नव्हे तर आजूबाजूच्या गावांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
ठाण्यात 3 जूनपर्यंत बंदी ठाणे शहरात कोणालाही ड्रोन उडवण्यास 3 जूनपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी दिला आहे.






























































