पाणी केव्हा मिळणार, असे विचारताच मंत्री सावे पळाले

छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीप्रश्नावर झारीतील शुक्राचार्य बनलेल्या भाजपच्या नेत्यांना त्यांनीच बोलावलेल्या पत्रकार परिषदेत तोंड लपवण्याची वेळ आली. पाणी केव्हा मिळणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार संजय केणेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर पत्रकार परिषद गुंडाळून पळून गेले. पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार करताच बोबडी वळलेल्या भाजप नेत्यांनी पत्रकारांनाच प्रश्न विचारू नका अशी दमदाटीही केली.

महापालिका प्रशासनाच्या निजामी कारभारामुळे शहराचे पाणी नियोजन कोलमडले असून पाच दिवसांआड येणारे पाणी आता बारा ते पंधरा दिवसांनंतर मिळत आहे. याविरोधात शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचा धसका घेतलेल्या भाजप नेत्यांनी गुरुवारी घाईघाईत पत्रकार परिषद बोलावून सरकार पाणीप्रश्नावर कसे सजग आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला होता.

शिवसेनेच्या मोर्चामुळे शहराची बदनामी होऊन येथे येणारे उद्योग जातील, असा कांगावा मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड,  आमदार संजय केणेकर यांनी करण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्रकारांनीच भाजपचे दात त्यांच्याच घशात घातले. ‘तुम्ही डिसेंबरमध्ये पाणी देणार असे सांगता, अधिकारी दोन वर्षे पाणी मिळूच शकत नाही असे सांगतात. नेमके खरे काय आहे? पाणी कधी मिळणार?’ असा प्रश्नांचा भडिमार पत्रकारांनी करताच भाजपच्या बोलघेवड्या नेत्यांवर तोंड लपवण्याची वेळ आली.