डम्पिंग ग्राऊंडवरील ताण कमी होणार, अंधेरीत सुका कचरा वर्गीकरण, प्रक्रिया केंद्र सुरू

देवनार आणि कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचा ताण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने अंधेरीत सुका कचरा वर्गीकरण आणि प्रक्रिया केंद्र सुरू केले आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या या केंद्रात दररोज 10 लाख टन कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे.

मुंबईतील विविध भागांमधून संकलित कचरा विविध ठिकाणच्या क्षेपणभूमीवर योग्य प्रक्रिया करण्यासाठी दररोज वाहून नेला जातो. त्यामुळे क्षेपणभूमीवर कचऱ्याचा भार हलका करण्याच्या उद्देशाने अंधेरी येथील महाकाली गुंफा मार्गावर सुका कचरा वर्गीकरण आणि प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर, झिंटीयो आणि दालमिया पॉलिप्रो लिमिटेड यांच्यासोबत मिळून सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पालिका उपायुक्त विश्वास मोटे यांच्या हस्ते या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. के-पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन शुक्ला,तसेच खासगी पंपन्यांचे प्रतिनिधी यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.