भाजप आमदार आणि मंत्री जयकुमार गोरेंकडून माजी सभापती रामराजे निंबाळकरांना त्रास, रोहित पवार यांचा आरोप

भाजप नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी सत्तेचा गैरवापर केला अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली. तसेच गोरेंकडून माजी सभापती रामराजे निंबाळकरांना त्रास दिला जात आहे असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, सत्तेचा आणि पदाचा गैरवापर कसा असतो हे मंत्री जयकुमार गोरे प्रकरणात दिसत आहे. पदाचा गैरवापर करत न्याय मागणाऱ्या पिडीतेलाच जेलमध्ये टाकून आणि सत्य उजेडात आणणारे निर्भिड व खरे पत्रकार तुषार खरात यांना खोट्या गुन्ह्यात अडकवूनही या मंत्र्यांचं समाधान झाल्याचं दिसत नाही. म्हणूनच विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर साहेब यांना चौकशीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. पण सत्ता ही सदासर्वकाळ नसते असे रोहित पवार म्हणाले. तसेच आजची सत्ता उद्या जाईल त्यावेळी आपली काय अवस्था होईल, हे आज सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांनी विसरु नये असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.