दिल्लीत आपच्या 15 नगरसेवकांचे राजीनामे, MCD मध्ये वेगळा गट स्थापन करण्याची केली घोषणा

दिल्ली महानगरपालिकेतील (MCD) आम आदमी पक्षाच्या 15 नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी इंद्रप्रस्थ विकास पक्ष नावाच्या तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्याची घोषणाही केली आहे. मुकेश गोयल हे नवीन आघाडीचे नेतृत्व करतील. राजीनामा दिलेल्या नगरसेवकांमध्ये हेमचंद गोयल, हिमानी जैन, रुनाक्षी शर्मा, उषा शर्मा, अशोक पांडे, राखी यादव, साहिब कुमार, राजेश कुमार लाडी, मनीषा, सुमन अनिल राणा, देविंदर कुमार आणि दिनेश भारद्वाज यांचा समावेश आहे.

आप पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर नगरसेवकांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “आम्ही सर्व नगरसेवक 2022 मध्ये आपच्या तिकिटावर एमसीडीवर निवडून आलो होतो. मात्र 2022 मध्ये निवडणुका जिंकूनही पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व एमसीडी योग्यरित्या चालवू शकले नाही. वरिष्ठ नेते आणि नगरसेवकांमध्ये कोणताही समन्वय नव्हता. ज्यामुळे पक्ष विरोधी पक्षात आला आहे. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करू न शकल्यामुळे, आम्ही नगरसेवक पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत.”