
>>मंगेश दराडे
भाडय़ाने घर शोधताना नागरिकांची होणारी वणवण आता थांबणार आहे. परवडणाऱ्या दरात घराचे स्वप्न पूर्ण करणारे म्हाडा आता सर्वसामान्यांना त्यांच्या बजेट आणि पसंतीनुसार राज्यभरात भाडय़ाने घरेही उपलब्ध करून देणार आहे. यासाठी नो ब्रोकर, मॅजिकब्रिक्सच्या धर्तीवर म्हाडा लवकरच स्वतःचे पोर्टल लाँच करणार असून नागरिकांना घर भाडय़ाने घेण्यासाठी किंवा देण्यासाठी दलालांवर विसंबून राहण्याची गरज भासणार नाही. केवळ नाममात्र सर्व्हिस चार्ज भरून नागरिक या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. विशेष म्हणजे, भाडे करारनामा, पोलीस व्हेरिफिकेशन यासारख्या सुविधाही या पोर्टलवर उपलब्ध असणार आहेत.
घर घेणे सर्वांनाच परवडणारे नाही. मुंबईसह महाराष्ट्रात भाडय़ाच्या घरात राहणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या आहे. पण त्यासाठी अजूनही निश्चित धोरण नाही. केंद्र सरकारच्या ‘निती’ आयोगाच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र शासनाने म्हाडाला भाडेतत्त्वावर देण्यात येणाऱ्या घरांचे धोरण (रेंटल पॉलिसी) तयार करण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. येत्या एक ते दीड महिन्यात या धोरणाचा कच्चा मसुदा तयार होईल. त्यानंतर नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवून अंतिम धोरण तयार होईल. या धोरणासोबत म्हाडा आता सर्वसामान्यांना सहज आणि परवडणाऱ्या दरात भाडय़ाने घरे उपलब्ध व्हावीत यासाठी स्वतःचे ऑनलाईन पोर्टल लाँच करण्याच्या तयारीत आहे. या पोर्टलवर ग्राहकांच्या त्यांच्या पसंतीनुसार आणि बजेटनुसार भाडय़ाने घराची निवड करता येणार आहे, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
भाडय़ाने देण्यासाठी घरे बांधणार
म्हाडा आता भाडय़ाने देण्यासाठी स्वतंत्र घरे बांधणार आहेत. एखाद्या इमारतीमध्ये म्हाडाने 500 घरे बांधली असतील तर त्यातीच 450 घरे लॉटरीसाठी काढली जातील. उर्वरित घरे भाडय़ाने देण्यात येतील. राज्यभरात विक्री न झालेली म्हाडाची घरेदेखील भाडय़ाने दिली जाणार आहेत. म्हाडाच्या घरांचे भाडे आणि डिपॉझिट किती असावे याचाही अभ्यास सुरू आहे. म्हाडाच्या या घरांसह एसआरए, सिडको अशा सरकारच्या विविध संस्थांमार्फत उपलब्ध होणारी घरे तसेच बिल्डर किंवा एखाद्या व्यक्तीला आपले घर भाडय़ाने द्यायचे असेल तर ती व्यक्तीदेखील या पोर्टलवर आपल्या घरांची माहिती अपलोड करू शकणार आहे.
विद्यार्थी, कॅन्सरग्रस्तांना आधार
कॅन्सरच्या उपचारासाठी राज्यासह देशभरातून रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक टाटा रुग्णालयात येतात. मुंबईत राहण्याची सोय नसल्यामुळे त्यांना रस्त्यावरच राहावे लागते किंवा काही विद्यार्थ्यांना इंटर्नशिप किंवा परीक्षेच्या तयारीसाठी मुंबईला पाच ते सहा महिन्यांसाठी भाडय़ाने घर हवे असते. अशा गरजूंना त्यांच्या आवश्यकतेनुसार ठरावीक महिन्यांसाठीदेखील भाडय़ाने घर मिळण्याची सुविधा या पोर्टलवर असणार आहे.