
‘आज जे काही आपण बघतोय याला लोकशाही मानायची का हुकूमशाही हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर सोपं आहे. हुकूमशहा कोणीही असला तरी एक ना एक दिवस त्याला जावंच लागतं. हिटलरचंच उदाहरण आहे. त्याला संपूर्ण जग घाबरत होतं पण नियतीने कदाचित त्याला सांगितलं असेल, सगळं जग घाबरतं, तू नाही ना घाबरत? मग घालून घे स्वतःला गोळी आणि त्यालासुद्धा आत्महत्या करावी लागली. हाच हुकूमशहाचा शेवट असतो, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशातील हुकूमशाही कारभारावर आज हल्ला चढवला.
भाजपच्या सुडाच्या राजकारणातून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर संजय राऊत यांना 100 दिवस आर्थर रोड कारागृहात काढावे लागले. त्या अनुभवांचं थरारक चित्रण असलेलं ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक संजय राऊत यांच्या लेखणीतून साकारलं असून प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात एका दिमाखदार सोहळ्यात या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ पटकथाकार, लेखक, कवी जावेद अख्तर, तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले, न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसचे प्रकाशक शरद तांदळे उपस्थित होते.
‘हा एक कसोटीचा क्षण आहे. दिवस येतात, दिवस जातात… सरकार येतं, सरकार जातं… तेव्हा हे सरकारसुद्धा उद्या जाणार आहे आणि ते आपल्याला घालवावंच लागेल. केवळ कोणाला तरी काही व्हायचं आहे म्हणून नाही, तर ज्यांनी आपल्या स्वर्गासारख्या देशाचा नरक करण्याचा प्रयत्न चालवला आहे त्यांना नरकात टाकण्यासाठी आपल्याला लढावंच लागेल आणि जिंकावंच लागेल, असा वज्रनिर्धार उद्धव ठाकरे यांनी केला.
उपकार करायचे असतात… मोजायचे नसतात
संजय राऊत यांच्या पुस्तकातील अमित शहा यांच्यासंदर्भातील प्रसंगाचा दाखला यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला. अमित शहा हे बाळासाहेब ठाकरे यांची मदत मागण्यासाठी ‘मातोश्री’वर आले होते असा तो प्रसंग होता. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, मला जर कुणी विचारले की अमित शहा तुमच्या घरी आले होते का, तर मी सांगेन मला आठवत नाही. कारण आपल्या घराण्याने, वाडवडिलांनी कोणावर उपकार केले असतील तर ते मोजायचे नसतात. उपकाराची फेड ही कृतज्ञतेने करायची की अपकाराने करायची हे प्रत्येकावर अवलंबून असते.
याला लोकशाही म्हणायचे का…
तृणमूलचे खासदार साकेत गोखले यांनी तुरुंगात असताना एका कैद्याने त्यांना 500 रुपये नसल्याने जामीन झाला नसल्याचे सांगितले होते याचा उल्लेख आपल्या भाषणात केला होता. तो धागा पकडून उद्धव ठाकरे म्हणाले की, एकीकडे करोडो रुपयांचे भ्रष्टाचार सुरू आहेत तर दुसऱ्या बाजूला 500 रुपये नसल्याने एक कैदी तुरुंगात खितपत पडला आहे. या पद्धतीला लोकशाही म्हणायचे का, असा संतप्त सवाल करतानाच हे एकाधिकारशाहीने घडत आहे, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
यंत्रणांवर दबाव आणून विरोधी पक्षांच्या बाबतीत दुजाभाव करणाऱ्या मोदी सरकारच्या वागणुकीवरही उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रहार केला. जगात असा कोणताही देश नसेल जिथे मुख्यमंत्र्यांना अटक होते असे म्हणत त्यांनी अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची उदाहरणे दिली. आपण मुख्यमंत्री असतानाही राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिवांना सीबीआयने चौकशीला बोलावले होते. ममता बॅनर्जी यांच्या मुख्य सचिवांनी तर कंटाळून राजीनामा दिला होता, याचीही आठवण त्यांनी करून दिली.
ईडी लावण्याचा अधिकार राज्यांनाही द्या
हिंदुस्थानात संघराज्य पद्धती आहे, केंद्र हा शब्द नाही. केंद्र सरकारला जितका अधिकार आहे तितकाच कायद्याने राज्य सरकारलासुद्धा आहे आणि असलाच पाहिजे. ईडी, आयटी, सीबीआय, पीएमएलए कायद्याने कारवाईचा अधिकार दिल्लीतील सरकारला असेल तर तोच अधिकार महाराष्ट्रातल्या सरकारलासुद्धा पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठणकावून सांगितले. याच कायद्यांतर्गत तुरुंगवास भोगून आलेले संजय राऊत, साकेत गोखले आणि अनिल देशमुख या तिघांकडे चार्ज द्या आणि ते सांगतील त्यांच्यावर धाडी घाला, त्यांना तुरुंगात टाका, असे उद्धव ठाकरे म्हणाले. अशा प्रकाराविरोधात लढत राहिले पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले.
शिवसेनेला दुश्मन का समजता?
अमित शहा, शिवसेनेला कशासाठी दुश्मन समजता? तुमचे आणि आमचे मतभेद आहेत. भाजपचे बुरसटलेले हिंदुत्व शिवसेनेला मान्य नाही. राष्ट्रीयत्व हेच शिवसेनेचे हिंदुत्व आहे. हे म्हटल्यानंतर तुम्ही लगेच आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता. म्हणजे जणू काही पाकिस्तानपेक्षा आधी आम्हाला खतम करा… पाकिस्तान राहिला बाजूला, अशी तोफ उद्धव ठाकरे यांनी डागली. शिवसेनेला संपवण्याचा हा पहिलाच प्रयत्न नाही. यापूर्वी रजनी पटेल यांनीही शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करा, नाहीतर तुम्हाला तुरुंगात टाकू असे शिवसेनाप्रमुखांना सांगितले होते. त्यावेळी, ज्याक्षणी तुम्ही मला तुरुंगात टाकाल, त्याक्षणी बाहेर तुमची अंत्ययात्रा निघेल, असे शिवसेनाप्रमुखांनी बजावले होते असा इतिहास यावेळी उद्धव ठाकरे यांनी अधोरेखित केला. 1969 मध्ये तत्कालिन पंतप्रधान मोरारजी देसाईंचा ताफा अडवल्यामुळे शिवसेनाप्रमुखांना अटक करून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न झाला होता. तीन महिने ते तुरुंगात होते पण त्यानंतर शिवसेना पुन्हा तरारून उठली आणि सत्ताधीश झाली याचीही आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.
शिवसेनाप्रमुख सर्वांची परीक्षा घेताहेत
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज सर्वांची परीक्षा घेत आहेत असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा दिला. शंभर दिवस शेळीचे जगण्यापेक्षा एकच दिवस वाघासारखे जगा असे शिवसेनाप्रमुख म्हणायचे. संजय राऊत यांनी त्यांच्या पुस्तकाचे नाव ‘नरकातला स्वर्ग’ असे ठेवले आहे. जो नरकामध्ये स्वर्ग शोधतो किंवा नरकाला स्वर्ग बनवतो तो माणूस काय धाटणीचा असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर मराठी माणसाला आणि हिंदूंना आत्मविश्वास आणि जिद्द दिली. आज शिवसेनाप्रमुख बघताहेत की शिवसेनेने ज्यांना दिले ते घेणारे ‘खरे’ किती आहेत आणि भाडखाऊ पळणारे किती? आज जे स्वर्गामध्ये गेलेत… त्यांच्या दृष्टीने, त्यांनासुद्धा हा कार्यक्रम पाहिल्यानंतर आपण शिवसेनेत राहिलो असतो तर बरे झाले असते असा हेवा वाटला असता, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
एक तरी निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, मग टिमकी वाजवा
मोदी सरकारच्या वन नेशन, वन इलेक्शनवरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले की, वन नेशन, वन इलेक्शनसाठी आज निवडणूक आयोगाचे सगळे अधिकारी मुंबईत आले होते. वन नेशन, वन इलेक्शन नाव फार गोंडस आहे, पण निवडणुकीमध्ये पारदर्शकता कुठे आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असे देशाच्या सरन्यायाधीशांच्या मातोश्रींनी पण सांगितले आहे. संशय दूर करायचा असेल तर एकतरी निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या आणि मग तुमची टिमकी वाजवा. पण ते होणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. वन नेशन म्हटले तर देशाचा पंतप्रधान हा एकाच पक्षाचा प्रचारक होऊ शकत नाही, प्रचार करायचा असेल तर त्याने इतर पक्षांचा आणि अपक्षांचाही प्रचार केला पाहिजे. तरच लोकशाही आहे असे म्हणता येईल, असे ते पुढे म्हणाले. निवडणूक काळात पंतप्रधानांचे विमान जाते म्हणून इतरांची विमाने उडू दिली जात नाहीत, हे कसे काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राऊत कुटुंबीयांचे ऋण कसे व्यक्त करायचे समजत नाही
संजय राऊत यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला त्यांच्या आई, पत्नी, मुली, भाऊ, जावई उपस्थित होते. त्यांचा यावेळी उद्धव ठाकरे यांनी आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले की, संजय राऊत यांच्या कुटुंबीयांचे ऋण कसे व्यक्त करायचे समजत नाही. संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या आई आणि कुटुंबीयांनी जे धाडस दाखवले त्या धाडसाला सीमाच नाही, असे ते म्हणाले. घर ढेपाळले तर लढवय्या लढू शकत नाही. संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर मी आणि पत्नी रश्मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा आम्ही त्यांना आधार देण्याऐवजी त्यांनीच आम्हाला आधार दिला, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसे भेटत असतात. काही कायमचे सोबत राहतात आणि काही संधीसाधू संधी मिळताच पळून जातात, असे म्हणत त्यांनी गद्दारांना चपराक लगावली.
हे पुस्तक लढणारी नवी पिढी तयार करेल
तुरुंगातील सशासारख्या घुशी हा भाग सोडा पण लढणाऱ्यांना धीर देण्याचा उत्तम व यशस्वी प्रयत्न संजय राऊत यांनी या पुस्तकाद्वारे केला आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. असंख्य लढाया लढत आपण इथपर्यंत आलो आहोत आणि लढायला आजही अनेकजण तयार आहेत. हे पुस्तक वाचल्यानंतर तुरुंग या विषयातली भीतीच लोकांच्या मनातली निघून जाईल. या पुस्तकात रडगाणं नाही गायलंय, तर रडणाऱ्या लोकांना धीर देणारे लिखाण तू केले आहेस. हे पुस्तक सर्वांनी आवर्जून वाचावे, असे आवाहन करतानाच, हे पुस्तक सर्वत्र पसरो आणि लढणारी नवी पिढी तयार होवो अशा शुभेच्छा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
महाराष्ट्राचा स्वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, संजय राऊत यांचे उद्गार
तानाशाही जास्त दिवस चालत नाही. हुकूमशाहीला केव्हा तरी मातीत गाडले जातेच. जगाचा इतिहास आहे. या पुस्तकातून प्रेरणा घेतली तर महाराष्ट्र आणि देशातून हुकूमशाही गाडली जाईल व लोकशाहीचे राज्य येईल, असा विश्वास व्यक्त करतानाच शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, ‘काही लोकांनी महाराष्ट्राचा नरक केला आहे. आता महाराष्ट्राचा स्वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झालीय’.
संजय राऊत यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना देशातील हुकूमशाही राजवटीवर सडकून टीका केली. ईडीच्या माध्यमातून विरोधी पक्षातील अनेकांना त्रास देण्यात आला. मात्र असंख्य लोक झुकले नाहीत, असे सांगत निष्ठावंतांचे राऊत यांनी कौतुकही केले. ईडीच्या नादाला लागणारा मी शेवटचा माणूस होतो. आता ईडी आपल्या दारात येणार नाही, असेही ते म्हणाले. प्रकाशक शरद तांदळेंनी पुस्तक प्रकाशित करण्यासाठी दाखवलेल्या हिमतीचेही त्यांनी कौतुक केले.
आपण दररोज लिहिलेल्या संपादकीयवर जोरदार चर्चा होते. आता तर पुस्तक लिहिले आहे. त्यामुळे ‘चर्चा तर होणारच!’, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला. ईडीच्या अटकेमध्ये असणारे सर्वजण जामीन मिळालेल्यांची जजमेंट वाचून वाचून ‘बॅरिस्टर’ होऊनच बाहेर पडतात, असेही ते म्हणाले.
तुरुंगात सशाएवढे उंदीर, ‘त्यांच्या’बद्दल बोलणे बरं नाही!
आर्थर रोड तुरुंगात मोठमोठे उंदीर राजरोसपणे फिरत असतात. हे ससे इथे कुठून आले असे विचारताच, या ठिकाणच्या कुंदन शिंदे यांनी ते ससे नाहीत तर उंदीर असल्याचे सांगितले. या उंदरांना देशमुखांनी सुंदर नावेही ठेवली आहेत. पण ‘त्यांच्याविषयी’ आता मुख्यमंत्री असल्यामुळे बोलणं बरं नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. या पुस्तकातून प्रेरणा घेतल्यास महाराष्ट्रच काय, तर देशातून हुकूमशाही नष्ट होईल, गाडली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नेत्यांची चाटूगिरी करणाऱ्यांसाठी हे पुस्तक नाही
‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकात कटू आठवणी आहेत. मात्र त्या अनुभव म्हणून घ्यायला हव्यात असे ते म्हणाले. या पुस्तकात रडगाणे नसल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही गुंड लोक आहोत. आम्ही जेलमध्ये जाण्यास घाबरत नाही. आज देशाला अशा लोकांची गरज असल्याचेही ते म्हणाले.
झुकायचे नाही, लढायचे!
राजकीय सुडातून केलेल्या अटकेविरोधातील लढाईत प्रत्येकाने नैतिक पाठबळ दिल्याचे संजय राऊत म्हणाले. जेलमध्ये असतानाही सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करणारे ‘रोखठोक’ चांगलेच झोंबल्याचे ते म्हणाले. यामुळे आपली चौकशीही केली. मात्र जे घडणार होते त्याच्याबद्दल आपण चार दिवस आधीच लिहिल्याचे त्यांनी सांगितले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला सत्य आणि नैतिकतेची साथ सोडू नये अशी शिकवण दिली. जे सांगायचे ते सांगा, बोलू शकत नाही ते लिहा, असा त्यांचा सल्ला असायचा. ‘लाख तलवारे बडी आती है गर्दन की तरफ, सर झुकाना नही आता, झुकायेही नही!’ साकेत वाकला नाही, संजय सिंग झुकले नाहीत. जुलमी शासन व्यवस्थेच्या रणगाड्यासमोर झुकायचे नाही, लढायचे. कुणीतरी लढायला हवे, असेही राऊत म्हणाले.
पाकिस्तान व नरक यात मी नरकात जाणे पसंत करेन, जावेद अख्तर यांनी सुनावले
लोकशाहीत इमानदार मीडिया आणि पक्ष नसलेले नागरिक हवेत. त्यांना जे चांगलं वाटतं ते त्यांनी बोलावं. जे वाईट वाटतं ते बोलावं. त्यावरून मला सोशल मीडियावर भरपूर शिव्या पडतात. काही लोक म्हणतात जिहादी, तू पाकिस्तानात जा. मात्र मी पाकिस्तानात जाण्याऐवजी नरकात जाईन, असे परखड मत ज्येष्ठ पटकथाकार, लेखक- कवी जावेद अख्तर यांनी व्यक्त केले.
लोकशाहीत प्रत्येक पक्षाची गरज असते, निवडणुकीची गरज असते. झालीच तर इमानदार मीडियाचीही गरज असते. तसेच लोकशाहीत असे नागरिक असावेत जे कोणत्याच पक्षाचे नसावे. त्यांना जे चांगलं वाटलं ते त्यांनी बोलावं. जे वाईट वाटतं ते बोलावं. मी त्यापैकीच एक. त्यावरून मला सोशल मीडियावर भरपूर शिव्या पडतात. काही लोक म्हणतात तू काफीर आहे. नरकात जाशील. काही लोक म्हणतात जिहादी, तू पाकिस्तानात जा. नरक की पाकिस्तान ही चॉईस असेल तर मी नरकातच जायचं पसंत करेन, असे परखड वक्तव्य ज्येष्ठ पटकथाकार, लेखक- कवी जावेद अख्तर यांनी केले.
जावेद अख्तर पुढे म्हणाले, मी मुंबईत आलो. मी जे काही मिळवलं ते मुंबई आणि महाराष्ट्राने दिले. सात जन्मात मुंबईचे ऋण फेडू शकणार नाही. गेल्या 30 वर्षांत मला चार वेळा पोलीस संरक्षण मिळालं. चारपैकी तीन वेळा मुल्लांकडून धमकी आली. या सगळ्यात माझी भूमिका सांगणारा मी एक लेख लिहिला. लेख इंग्रजीत लिहिला होता, पण म्हटलं छापायचं कुठे. मी मग मराठीत भाषांतर केलं. मी संजय राऊतांना फोन केला, त्यांना भेटलो. मी म्हटलं एक लेख लिहिला आहे. तुम्ही तो ‘सामना’मध्ये छापावा. त्यांना मी लेख दिला. त्यांनी पाच मिनिटांत वाचलं. ते म्हणाले, कुणी भाषांतर केलं. चांगलं भाषांतर केलं. त्यांनी माझं कौतुक केलं नाही. त्यामुळे ते लेख छापून येईल का अशी शंका आली. मी म्हटलं, मी मनापासून लिहिलं. तुम्ही छापा. राऊत म्हणाले, तुम्ही मनापासून लिहिलं तर ‘सामना’तच छापणार. अनेक ठिकाणी तेच आर्टिकल छापून आलं. पण कुणी परिच्छेद कापला. तर कुणी शब्द बदलला. फक्त ‘सामना’तच जशाच्या तसा लेख छापून आला. त्यामुळे मी राऊतांचा भक्त झालो. अंधभक्त नाही. डोळे उघडे ठेवणारा भक्त.
न्याय व्यवस्था ही ईडीच्या हातात जायला नको! शरद पवार यांचे प्रतिपादन
सत्तेचा गैरवापर कसा होतोय हे संजय राऊत यांच्या पुस्तकातून समजते. सरकारविरोधात बोलणाऱ्यांशी ईडी कशी वागते याचे हे उदाहरण आहे. पीएमएलए कायद्याचा वापर करून राजकीय पक्षांना उद्ध्वस्त करण्याची जी तरतूद केली आहे ती बदलावी लागेल. न्यायव्यवस्था ही ईडीच्या हातात जायला नको, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
संजय राऊत यांचे पुस्तक म्हणजे सरकारविरोधात बोलणाऱ्यांशी ईडी कशी वागते हे सांगणारे असल्याचे शरद पवार म्हणाले. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप होता. मात्र प्रत्यक्षात प्रकरण कोर्टात गेल्यानंतर दोन शून्य गायब झाले आणि एक कोटीचा आरोप झाला. ही कारवाईदेखील सूडबुद्धीने केल्याचा टोला शरद पवार यांनी लगावला. मला आठवतं की, त्यावेळी मी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो. पी. चिदंबरम हे त्यावेळी माझे सहकारी होते. चिदंबरम यांनी कायद्यात दुरुस्ती करण्याची कशी आवश्यकता आहे, यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या समोर आणला. तो प्रस्ताव वाचल्यानंतर मी डॉ. मनमोहन सिंग यांना सांगितलं की, हा प्रस्ताव अत्यंत घातक आहे. हा प्रस्ताव मान्य होता कामा नये अशी भूमिका मी घेतल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
पहिली कारवाई चिदंबरम यांच्यावरच झाली
आरोपीला मी गुन्हा केला नाही, गुन्हेगार नाही हे सिद्ध करण्याची तरतूद या कायद्यात केली गेली. मी याला स्पष्ट विरोध केला होता. उद्या राज्य बदललं तर त्याचा परिणाम आपल्यालाही भोगावा लागू शकतो, असं मी म्हणालो होतो, पण ते ऐकलं गेलं नाही. राज्य गेलं आणि पहिली कारवाई ही चिदंबरम यांच्यावर केली गेली.
50 वर्षांनंतर हे पुस्तक इतिहासाचा भाग असेल, साकेत गोखले यांचा वक्तव्य
संजय राऊत यांनी तुरुंगातील अनुभवच नाही, तर हुकूमशहाविरोधातील लढ्याविषयी लिहिले आहे. तसं सगळ्यांनाच लिहिता येत नाही, परंतु त्यांनी आम्हासारख्या खूप जणांच्या वतीने लिहिले आहे. हे पुस्तक देशाच्या स्वातंत्र्यलढ्याप्रमाणे 50 वर्षांनंतरही इतिहासाचा भाग असेल, असे तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले म्हणाले.
अभिव्यक्ति स्वातंत्र्याकरिता लढा देणारे साकेत गोखले यांनाही खासदार संजय राऊत यांच्याप्रमाणे तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगातील अनुभवांविषयी बोलताना गोखले म्हणाले, एखादा राजकारणी किंवा अतिमहत्त्वाची व्यक्ती तुरुंगात गेली की त्याला कशी व्हीआयपी वागणूक मिळते असे चित्रण आपण सिनेमांमधून पाहतो. पण खरी गोष्ट अशी आहे की, तुरुंगात गेलेल्या व्यक्तीला कसे तोडता येईल, तिची पाठ कशी मोडता येईल अशीच वागणूक दिली जाते आणि मग ती व्यक्ती विरोधी पक्षातील असेल तर तिला वाईटातील वाईट वागणूक दिली जाते. त्यामुळे तुरुंगातून दोनच प्रकारे लोक बाहेर येतात, एक म्हणजे पूर्णपणे तुटून, मोडून. इतके की, त्यांना आपल्या सावलीचीही भीती वाटावी. आणि दुसरा प्रकार म्हणजे ज्यांच्या मनातून भीती पूर्णपणे गायब होऊन जाते. संजय राऊत हे दुसऱ्या प्रकारातले आहेत.
मला तिसऱ्यांदा तुरुंगात टाकले तेव्हा मला सांगण्यात आले, सेटल करा, दोन दिवसांत जामीन होऊन जाईल. पण राजकारणात तुम्ही कितीही पैसे टाकले तरी विश्वास आणि इमानदारी मिळू शकत नाही. आमचा तुरुंगात छळ झाला. पण मी असो, संजय राऊत असो वा समोर बसलेले अनिल देशमुख असो, आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्यांशी गद्दारी करणार नाही. आमचे नेते ममता बॅनर्जी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेही आमच्या आणि कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. हे प्रेम, इमानदारी बाकीचे समजू शकत नाहीत, असा घणाघात गोखले यांनी केला. गोळी असलेली बंदूक डोक्यावर ठेवून एखाद्याकडून काहीही करवून घेता येऊ शकते, पण ती गोळी एकदा झाडली की तुमच्या मनात भीती राहत नाही, असे ते म्हणाले.