
एकीकडे हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. असे असले तरी घाबरून जाण्याचे कारण नाही असे प्रशासनाने म्हटले आहे. 2020 आणि 2021 साली कोरोनाची लाट आली होती आणि त्यात लाखो रुग्णांचा मृत्यू झाला होता. आता ही लाट नसून फक्त काही रुग्णांची संख्या वाढली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. केंद्र सरकाच्या वेबसाईटनुसार सध्या देशात कोरोनाचे 93 सक्रिय रुग्ण आहेत. महिन्याकाठी मुंबईत 8 ते 9 रुग्ण आढळतात अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच कोरोना हा आपल्यात राहणारच आहे असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
असे असले तरी शहरातल्या तापाच्या रुग्णांकडे लक्ष देण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. शनिवारीही ब्रीच कँडी रुग्णालयातही कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत 28 टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण रुग्णांची संख्या 14 हजार 200 इतकी झाली आहे. तसेच रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या संख्येत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.