गावावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचा मुंबई-गोवा महामार्गावर खोळंबा; 6 किलोमीटरच्या रांगा

उन्हाळी सुट्ट्या सुरू असल्याने कोकणात दररोज पर्यटक तसेच चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. त्यातच शनिवार व रविवारी वीकेंडला त्यात मोठी भर पडते.  मात्र मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण व वाहतुकीच्या योग्य नियोजनाचा अभाव याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. कोकणातून मुंबईकडे परतणाऱ्या पर्यटक तसेच चाकरमानी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीत  अडकले. माणगाव ते इंदापूरदरम्यान मोठा ट्रफिक जाम लागला. सुमारे पाच ते सहा किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. तसेच कोलाड, नागोठणे येथेही काही प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण झाली होती. यामुळे पोलादपूर ते पळस्पे हे 155 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना सुमारे सात तासांचा वेळ लागला.

शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे चाकरमानी कोकणातील घरी डेरेदाखल झाले आहेत. पर्यटकही मोठ्या प्रमाणात कोकणातील पर्यटनस्थळांवर येत आहेत. चाकरमानी व पर्यटक रविवारी परतीच्या प्रवासाला निघतील व महामार्गावर वाहनांच्या वर्दळीत वाढ होणार असल्याची कल्पना प्रशासनाला होती. मात्र वाहतूककोंडी होणार नाही यासाठी योग्य नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र दिसून आले.

मागील 14 वर्षांपासून महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. माणगाव बायपासचे कामही रखडले आहे. ठिकठिकाणी मोऱ्यांची कामे अपूर्ण आहेत. याचा मोठा फटका वाहनचालकांना बसला. महामार्गावरील नागोठणे, कोलाड, इंदापूर, माणगाव येथे वाहतूककोंडी निर्माण झाली होती. माणगाव, इंदापूरजवळ तर पाच ते सहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलादपूर ते पळस्पे हे 155 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना सुमारे सात तासांचा वेळ लागत होता. वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ येत होते.

अलिबाग-वडखळ मार्गावरही वाहतूककोंडी

रविवारी चाकरमानी व पर्यटक मुंबईकडे परतीच्या प्रवासाला निघाले. त्यातच मार्गावरील पेझारी येथे शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला शेकाप कार्यकर्ते जिल्हाभरातून मोठ्या संख्येने वाहने घेऊन आले होते. यामुळे अलिबाग-वडखळ मार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली. परिणामी अलिबाग, वडखळ व जलपाडा, पेझारी या एमआयडीसी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण झाली होती.