
आधीच कांद्याला अत्यल्प दर मिळत असताना या अवकाळी पावसामुळे चाळीत साठवणूक केलेला कांदाही सडू लागला आहे. त्यामुळे भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेले कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
केंद्र सरकारच्या बदलत्या धोरणांमुळे उन्हाळ कांद्याला सध्या 700 ते 1100 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळत आहे. आज ना उद्या दरवाढ होईल या आशेने शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा चाळीत साठवण्यास सुरुवात केली. आधीच लागवडीवेळी झालेल्या पावसामुळे रोपे खराब होऊन दुबार पेरणी करावी लागली होती, त्यासाठी अतिरिक्त मजुरी द्यावी लागल्याने लावणीचा खर्चही वाढला. काढणीच्या वेळीही अवाचे सवा खर्च करून हा कांदा शेतकऱ्यांनी चाळीत साठवला. मात्र, या अवकाळी पावसामुळे अवघ्या दीड महिन्यातच तो सडू लागला. भऊर येथील प्रभाकर पवार यांनी एप्रिल महिन्यात कांद्याची साठवणूक केली. मात्र, या अवकाळी पावसाने चाळीतून पाणी वाहून गेल्याने तो कांदाही खराब झाला. दोन पैसे मिळण्याच्या उद्देशाने साठवलेला कांदा काढून टाकण्याचा खर्चच त्यांना करावा लागला. अशीच स्थिती कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा भागातील बहुतांश कांदा उत्पादकांची झाली आहे.
शेतकरी प्रतिकूल परिस्थितीत असूनही शासन मात्र याबाबत गंभीर नाही. कोणत्याच पिकाला भाव नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक समीकरणे विस्कळीत झाली आहेत. सरकारने कांद्याला योग्य भाव व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी केली आहे.