
9 जून 2025 रोजी किल्ले रायगड येथे साजरा होणाऱ्या 352 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीसाठी राज्य शासन, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती व मावळे सज्ज झाले आहेत. विविध कार्यक्रमांनी हा सोहळा दिमाखदार साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती किल्ले रायगड अध्यक्ष सुनील पवार यांनी कुडाळ येथे दिली. नियोजनाची आढावा बैठक रायगड येथे झाली.
रायगड येथे 352 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक रायगड जिल्हाधिकारी जावळे, रायगड पोलीस अधीक्षक घार्गे, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष सुनील पवार तसेच अनेक विभागाचं प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली. श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीसंदर्भात या बैठकीदरम्यान चर्चा करण्यात आली. तसेच शासनातर्फे सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या शिवभक्तांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष सनी ताठेले, सचिव समीर वारेकर, जनसंपर्प प्रमुख रंजन गावडे, सदस्य संजय ढमाळ व निलेश सकट उपस्थित होते.