
शिवराज दिवटे या मुलाला मारण्यासाठी अपहरण करून सामूहिक कट रचला. त्याच्या डाव्या छातीवर, पायावर आणि पाठीवर भयानक मार असल्याचे सांगत, एकदाचा या टोळीचा नायनाट आपल्यालाच करावा लागेल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज अंबाजोगाई येथे दिला. दिवटे याची भेट घेतल्यानंतर जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते.
खासदार बजरंग सोनवणे यांनी रुग्णालयात जाऊन पीडित युवक शिवराज दिवटे याची भेट घेतली. त्याच्या वडिलांशीही चर्चा केली. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली. जिल्ह्यात वारंवार घडणाऱ्या अशा घटना रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक दर्जाचा एक विशेष अधिकारी व त्याला काही कर्मचारी अशा पद्धतीने नियुक्ती करावी या मागणीसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. परळीमध्ये 1990-92 पासून सत्ता असल्याने अनेकांना सत्तेची मस्ती आली आहे. त्यातूनच असे प्रकार घडत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला. या प्रकरणात उर्वरित आरोपींना तत्काळ अटक करून ‘मोक्का’ लावावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी खासदार सोनवणे यांच्यासह राजेसाहेब देशमुख, अमर देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेदेखील उपस्थित होते.