रत्नागिरीच्या जगबुडी नदीत कार कोसळली, पाच जणांचा मृत्यू; अंत्यविधीसाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला

मुंबई गोवा महामार्गावर भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावर सोमवारी पहाटे ५:३० च्या सुमारास भीषण अपघात झाला. मीरारोड येथून देवरुख येथे अंत्यविधीसाठी निघालेल्या कुटुंबाची कीया गाडी दीडशे फूट खोल नदीपत्रात कोसळली. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेत विवेक श्रीराम मोरे यांच्या कुटुंबावर काळाचा घाला पडला.

विवेक मोरे यांच्या सासऱ्यांचे देवरुख येथे निधन झालं होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी संपूर्ण कुटुंब मुंबईहून देवरुखकडे निघाले होते. गाडी भरणे जगबुडी पुलावरून उतरत असताना चालकाचे गाडीच्या वेगावरील नियंत्रण सुटल्याने गाडी दोन ब्रिजच्या मधील तुटलेल्या कठड्यामधून थेट 150 फूट खोल असलेल्या नदीपात्रात कोसळली. यावेळी सर्वजण झोपेत होते. अपघातग्रस्त गाडीत असलेले विवेक मोरे हे सुखरूप बचावले असून त्यात त्यांची पत्नी मिताली मोरे, निहार मोरे, श्रेयस सावंत, मेघा पराडकर आणि सौरभ परमेश्वर पराडकर यांचा मृत्यू झाला आहे. सर्वजण मिरा रोड मुंबईचे रहिवासी आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केले. गाडीत अडकलेले मृतदेह मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आले, यात गंभीर जखमी स्वप्निल याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी कलंबनी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
विशेष म्हणजे जगबुडी नदीवरील या पुलावर आत्तापर्यंत पंधरा ते वीस उपघात झालेले आहेत. महामार्गावरील जगबुडी पुलावरील सुरक्षा कठडे वारंवार तुटत असून त्याची दुरुस्ती नियमित होत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. संरक्षक कठडे वेळीच दुरुस्त करण्यात आले असते तर ही गाडी जगबुडी नदीपात्रात कोसळली नसती असे नागरिकांनी सांगितले.
प्रशासनाकडून या ठिकाणी तातडीने कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरत आहे. या अपघाताचे वृत्त कळतात सामाजिक कार्यकर्ते बुरहान टाके, मदत ग्रुपचे प्रसाद गांधी, प्रतीक जाधव माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचे सहकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. औटी, पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी देखील घटनास्थळी तात्काळ पोहोचून क्रेनच्या सहाय्याने नदीपत्रात कोसळलेली गाडी बाहेर काढून त्या गाडीचे दरवाजे तोडून मृतदेह तसेच जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पाठवले.