केडीएमसीच्या बॅनरवर मिंधे पिता-पुत्रांची छबी; मुख्यमंत्री फडणवीस गायब

केडीएमसीने आयोजित केलेल्या शासकीय कार्यक्रमांच्या बॅनरवर मुख्यमंत्री फडणवीस गायब झाले असून बॅनरवर मिंधे पिता-पुत्रांची छबी झळकत आहे. यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी संतापलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाने पालिकेने खुलासा करावा अशी मागणी करत प्रशासनाचा निषेध केला आहे. दरम्यान, प्रशासनाच्या या एकतर्फी धोरणावरून भाजप आणि मिंध्यांमध्ये संघर्ष वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पालिकेतर्फे कचरा संकलन व शहर स्वच्छता प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा सावळाराम महाराज क्रीडा संकुलात पार पडला. या कार्यक्रमासाठी संपूर्ण शहरात महापालिकेच्या वतीने बॅनरबाजी करण्यात आली होती. मात्र या बॅनरवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांचा फोटो न लावता केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा फोटो झळकवण्यात आल्याने भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. माजी नगरसेवक मंदार टावरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे संताप व्यक्त करत प्रशासनाचा जाहीर निषेध केला.

जर कल्याण-डोंबिवली पालिकेने लावले आहेत तर हा कोणता प्रोटोकॉल आहे? खासदारांनी निधीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत म्हणे, जर निधी महापालिकेचा आहे तर विशेष प्रयत्न करण्याची प्रक्रिया काय, याचाही महापालिकेने खुलासा करावा. जर महापालिका कोणत्याही राजकीय पक्षाची जाहिरात करत असेल तर याचे जाहीर निषेध करतो अशी पोस्ट टावरे यांनी केली आहे.