
हिंदुस्थानी शेअर बाजारात मंगळवारी घसरण पाहायला मिळाली. तिसऱ्या सत्रात जोरदार घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना जोरदार झटका बसला. विदेशी गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणात शेअर्सची विक्री केल्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 872 अंकांनी घसरून 81,186 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 261 अंकांनी घसरून 24,683 अंकांवर स्थिरावला.
ऑटो आणि फायनांशियलच्या शेअर्समध्ये मोठय़ा प्रमाणात विक्री झाली. यामध्ये आयशर मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, मारुती सुझुकी, सिपला आणि श्रीराम फायनान्सचे शेअर्स घसरले. फेडच्या राफेल बोस्टिकने 2025 मध्ये केवळ एकच व्याजदर कपात करण्याचे संकेत दिल्याने महागाईची चिंता वाढली. एफआयआयएसने 525.95 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. जपानी बॉण्डचा लिलाव कमजोर ठरला, हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार वार्ता अनिश्चित, जागतिक व्यापारावर तणाव, रुपयांत घसरण आणि हाँगकाँग व सिंगापूरमध्ये कोविडचे रुग्ण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या सर्व कारणांमुळे आज शेअर बाजारात घसरण झाल्याचे जाणकारांचे मत आहे.
5.35 लाख कोटी स्वाहा
बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन मंगळवारी 438.32 लाख कोटी रुपयांवर आले. सोमवारी ते 443.67 लाख कोटी रुपये होते. याचाच अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 5.35 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे.
झोमॅटोला जोरदार झटका
निफ्टी आणि इंडेक्समध्ये सर्वात जास्त घसरण झाली. सेन्सेक्सच्या 30 पैकी 26 शेअर्समध्ये घसरण. झोमॅटोचे शेअर्स 4.24 टक्क्यांच्या घसरणीसह 227.90 रुपयांपर्यंत खाली आले. मारुती, एमअँडएम, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि पॉवर ग्रीडमध्ये मोठी घसरण झाली आहे. टाटा स्टील, इंडसइंड बँक, आयटीसी आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्येही घसरण झाली.