
राज्याच्या विविध भागांत झालेल्या वादळी पावसामुळे झाडे कोसळणे, होर्डिंग पडणे, मंडप कोसळणे, मोबाईल टॉवर कोसळल्याच्या घटना घडल्या. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे समुद्राला उधाणाची स्थिती निर्माण झाली आहे. 24 मेपर्यंत तो तीव्र राहणार आहे. त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
मुंबई : मुंबईत सायंकाळच्या सुमारास पावसाला सुरुवात झाल्याने कामावरून घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. दरवर्षी पावसाळय़ात मनस्ताप ठरणारा अंधेरी सब वे पाणी तुंबल्याने या वर्षी मान्सूनपूर्व पावसातच बंद करण्याची वेळ पालिकेवर आली.
सातारा : अचानक झालेल्या जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने सातारा-कास रस्त्यावरील मोबाईल टॉवर दुचाकीवर कोसळला. तर वादळी पावसामुळे पर्यटक यवतेश्वर घाटात अडकून पडले.
पुणे : पुण्यातदेखील मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातले. फुरसुंगी येथे पार्किंगच्या गाड्यांवरील पत्र्याचे छप्पर उडाले तर वाघोलीसह तीन ठिकाणी महाकाय होर्डिंग कोसळले. 15 झाडेही उन्मळून पडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. शहरातील शिवाजी नगर, औंध, बाणेर, जे. एम. रोड, एफ. सी. रोडसह शहरातील अनेक रस्ते जलमय झाले. सणसवाडी होर्डिंग कोसळल्याची घटना घडली.
जालना : जालन्यात वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे तुपेवाडी गावात धार्मिक कार्यायासाठी उभारलेले मंडप कोसळून पडले. सोलापूरमध्ये बार्शी तहसील कार्यालयासमोर पॅण्टीनचे छत कोसळून पडले. यात पाच जण अडकले होते.