ठाण्यात चाललंय काय? टेंभी नाक्यावर तलवारी नाचवत मिंधेंच्या नगरसेवकावर हल्ला

ज्या टेंभी नाक्यावरून धर्मवीर आनंद दिघे यांनी सर्वसामान्यांना न्याय दिला, गुंडगिरीला पायबंद घातला, नंगानाच करणाऱयांच्या मुसक्या आवळून कायमचा बंदोबस्त केला त्याच टेंभी नाक्यावर भररस्त्यात नंग्या तलवारी नाचवत मिंधे गटाच्या माजी नगरसेवकावर तलवारीने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. नगरसेवकाच्या कार्यालयाबाहेर बसलेल्या लोकांवर वार केल्यानंतर हल्लेखोर नगरसेवकाच्या दिशेने धावले, पण उपस्थितांनी खुर्च्यांचा मारा केल्याने हल्लेखोर पळून गेले. या घटनेमुळे धर्मवीरांच्या टेंभी नाक्यावर कायदा-सुव्यवस्थेचा चिंधडय़ा उडाल्याचे स्पष्ट झाले असून ठाण्यात चाललंय तरी काय? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

मिंधे गटाचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह टेंभी नाका येथील नवरात्र मंडळाच्या कार्यालयाबाहेर नेहमीप्रमाणे बसले होते. हे कार्यालय धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमाशेजारीच आहे. त्याचवेळी एक रिक्षा आणि दुचाकी त्या ठिकाणी आली. एका महिलेसह चार ते पाच जण रिक्षा आणि दुचाकीवरून उतरले. त्यातील महिलेने कोकाटे यांच्याकडे पाहून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर एका तरुणाने हातात तलवार घेत कोकाटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दिशेने धाव घेतली. या हल्ल्यात कोकाटे यांचे सहकारी गजानन म्हात्रे यांच्या हातावर आणि पाठीवर वार झाले. त्यानंतर हल्लेखोर कोकाटे यांच्या दिशेने येत असतानाच कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर खुर्च्या फेकून मारल्या. त्यामुळे भेदरलेले हल्लेखोर तेथून फरार झाले. त्यामुळे या हल्ल्यातून कोकाटे बचावले.

गेल्या आठवडय़ात टेकडी बंगला भागात एका तरुणावर हल्ला झाला होता. या हल्ल्याप्रकरणी कोकाटे यांच्या मुलासह काही जणांविरोधात गुन्हा दाखल होता. या वादातून हा हल्ला झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून हल्ल्याची योजना आफरिन खान नावाच्या महिलेने आखली होती. या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झालाआहे. दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत. मी टेंभी नाका येथे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हजर असतो. यावेळी हा अचानक हल्ला झाला. मात्र माझ्या सहकाऱयांच्या सतर्कतेमुळे मी बचावलो असल्याचे कोकाटे म्हणाले.

पोलिसांच्या नाकावर टिच्चून गुंडांनी झळकावले बॅनर

ठाण्याच्या नाक्यानाक्यावर गुंडांचे बॅनर झळकत आहेत. एका कुख्यात गुंडाच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावण्यात आले असून बॅनरवर मिंधे पितापुत्रासह मोक्का, तडीपार, खंडणीखोर, हत्येसारखे गुन्हे दाखल असलेल्या नामचीन गुंडांचे पह्टो छापण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुसंस्कृत ठाण्यात गुंडांचा हैदोस खुलेआम सुरू असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.