
मुळशी तालुक्यातील भुकूममध्ये दोन कोटींच्या हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ केल्यामुळे विवाहितेने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी विवाहितेच्या पती, सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे तर सासरे आणि दीर अद्याप फरार आहेत. विवाहितेचा सासरा हा अजित पवार गटाचा माजी तालुकाध्यक्ष आहे.
विवाहितेचे नाव वैष्णवी हगवणे (24) असून तिचा 28 एप्रिल 2023 साली शशांक हगवणे याच्याशी विवाह झाला होता. वैष्णवीचे वडील आनंदा कस्पटे यांनी मुलीच्या लग्नात 51 तोळे सोने, चांदीची ताटे आणि फॉर्च्युनर कार भेट दिली होती. लग्नानंतर काही दिवसांतच हगवणे पुटुंबीयांनी वैष्णवीचा पैशासाठी छळ सुरू केला. माहेरून पैशासाठी मारहाण करत तिचा छळ सुरू केला. अखेर छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली. या प्रकरणी पती शशांक, सासू लता, नणंद करिष्मा यांना अटक करण्यात आली असून सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार आहेत. पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत आहे.
पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येप्रकरणी अटक केलेल्या पती, सासू व नणंद यांच्या पोलीस कोठडीत 26 मेपर्यंत वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले तर सासरा राजेंद्र आणि दीर सुशील अद्याप पसार आहेत. त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना केली आहेत. पती शशांक, सासू, नणंद यांची कोठडी 26 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. शवविच्छेदनाचा व्हिसेरा राखून ठेवला असून शवविच्छेदन अहवालात काही निष्पन्न झाल्यास त्यानुसार कलमवाढ केली जाईल. हगवणे पुटुंबाची फॉर्च्यूनर मोटार, दुचाकी जप्त केली आहे, असे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले.