
खोतकरप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल करून तपास करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच अंदाज समितीच्या अध्यक्षांना 15 कोटी रुपये देण्याचा सौदा असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात भ्रष्टाचार हा विधीमंडळापर्यंत पोहोचला आहे. लोकशाहीमध्ये आपण ज्याला पवित्र मंदिर म्हणतो. या राज्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या राज्यात हा भ्रष्टाचार हा या मंदिरापर्यंत पोहोचला. आणि विधानसभेचे अध्यक्ष, राज्याचे मुख्यमंत्री या भ्रष्टाचाराचे मूक समर्थक आहेत. अंदाज समिती ही विधीमंडळातली अत्यंत महत्त्वाची समिती आहे. शासनातर्फे जी कामं होतात, ती योग्य प्रकारे नियमांनुसार झालीत की नाही याचे तपास करणे, साक्षी पुरावे करणे अशी अनेक कामं या समितीद्वारे होत असतात. पण ही समिती आणि याचे अध्यक्ष अर्जून खोतकर किती भ्रष्ट आहेत. खोतकर शिंदे गटात गेले. एकनाथ शिंदेंना उंदीर म्हणणारे हेच गृहस्थ. हे निष्ठेची आणाभाका घ्यायचे आणि ईडीला घाबरून तिथे गेले. त्यांना अंदाज समितीचे अध्यक्षपद यासाठी दिले होते. काल धुळ्याच्या 102 क्रमांक विश्रामगृहातील खोलीमध्ये पाच ते साडेपाच कोटी रुपये गेल्या तीन दिवसांपासून जमा झाली आहे. ही अंदाज समिती, त्याचे अध्यक्ष अशा प्रकारच्या कामासाठी धुळ्याच्या दौऱ्यावर होते. पण शासकीय कामामध्ये प्रचंड घोटाळे, भ्रष्टाचार आणि कमी दर्जाची कामं झाल्याने ते प्रकरण काढून सर्व ठेकेदारांकडून 15 कोटी रुपये गोळा करण्याची जबाबदारी अंदाजसमितीच्या अध्यक्षांकडे देण्याची जबाबदरी ठेकेदारांनी घेतली. अंदाज समितीचे जे सचिव आहेत पाटील त्यांची नियुक्ती करण्यात आली. 102 क्रमांकाच्या खोलीत साडे पाच कोटी रुपये एवढी रक्कम जमा झाली आणि पुढल्या दोन दिवसांत 10 कोटी रुपये जमा होणार होते. 15 कोटी रुपये अंदाज समितीच्या अध्यक्षांना देण्याचा सौदा झाला होता. ही बाब मी फार जबाबदारीने सांगतोय. हे पैसे जमा न झाल्यास सर्व ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याची धमकी खोतकरानी ठेकेदारांना दिली होती. सर्व ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची आणि त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल होण्याची शिफारस करने अशी धमकी अर्जून खोतकर यांनी ठेकेदरांना दिली आणि त्यानंतर ही रक्कम जमा व्हायला लागली. शिवसेनेतले आमचे धुळ्यातले नेते माजी आमदार अनिल गोटे आणि शिवसैनिकांच्या कानावर ही गोष्ट केली. खरंतर याबाबतीत गोटे यांचे आभार मानले पाहिजे. गोटे यांनी शिवसैनिकांसह विश्रामगृहावर धडक मारली. तेव्हा 102 मधले जे लोक घाईघाईने टाळं लावून पळून गेले. जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे पोलीस प्रमुख, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे जिल्ह्याचे प्रमुख यांनी ही खोली येऊन उघडावी आणि याचा पंचनाना करावा आणि संबंधित लोकांवर कारवाई व्हावी अशी मागणी आहे. चार ते पाच तास अनिल गोटे तिथे ठिय्या मांडून होते. तरीही ना पोलीस आले, ना जिल्हाधिकारी आले आर्थिक गुन्हे शाखा, ईडी जे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करते त्यांचे काम आहे. पाच लाखांसाठी तुम्ही गुन्हे दाखल करता ना, शेवटी लोकांचं आणि शिवसैनिकांचा दबाव वाढल्यानंतर हे लोक आले आणि त्यानी टाळं उघडलं. अजूनही पैश्यांची मोजणी सुरू आहे. बाकी लोक फरार आहे. आता फक्त अंदाज समितीचे अध्यक्ष फरार झाले आहेत का हे पहावं लागेल. आता सगळे काखा वर करतील आणि तो मी नव्हेच असं म्हणतील. हे 15 कोटी रुपये शिंदे गटाच्या जालन्याचे आमदार यांना देण्यासाठीच जमा झाले होते हे सांगायला आता ब्रह्मदेवाची गरज नाही. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खरं म्हणजे ज्यांच्या नावावर ही खोली होती, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून हे संपूर्ण प्रकरण ईडी आणि सीबीआयकडे देण्याची गरज आहे. गेल्या वर्षभरात आणि त्याच्या आधीच्या वर्षभरात अंदाज समितीच्या कशा कशा बैठका झाल्या आणि या पद्धतीने पैसे जमा झाले. आतापर्यंत अध्यक्षांकडे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे जमा झाल्याची माझ्याकडे माहिती आहे. फडणवीसांच्या काळातलं हे आमचं राज्य आहे. गुन्ह्याचे ठिकाण सरकारी विश्रामगृह. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय करत आहेत? त्यांच्याच अखत्यारीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येतो. मग काय हा विभाग काय फक्त तुमच्या राजकीय विरोधकांसाठी वापरणार? अर्जून खोतकरांना अटक करणार का? जर तुम्ही खरे असाल तर या प्रकरणार गुन्हा दाखल होणे गरजेचा आहे. तुम्ही स्वतः भ्रष्टाचाराने सडलेले आहात त्यामुळे या गोष्टी तुम्हाला दिसत नाहीत आणि तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना वाचवत आहात. कारण तुमचं सरकार या भ्रष्टाचाराच्या दलदलीतून निर्माण झालं आहे. विधानसभेला आणि लोकशाहीचं मंदिर म्हणतो. राहुल नार्वेकर जेव्हापासून अध्यक्ष झाले आहेत हा भ्रष्टाचार सरकार बनवण्यापासून, बहुमत सिद्ध करण्यापासून आणि बेईमानी निर्णय देण्यापासून तो अशा प्रकारे अंदाज समितीच्या अध्यक्षांनी कोटी रुपये सरकारी जागेत गोळा करेपर्यंत भ्रष्टाचार आहे. अर्जून खोतकर यांच्यावर काय कारवाई होणार आहे? ज्याच्या नावावर ही खोली होती त्यांची चौकशी व्हावी. कालमर्यादेत हा तपास झाला पाहिजे अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.
महाराष्ट्र भ्रष्टाचाराच्या चिखलात गट्यांगळा खातोय आणखी दोन गट्यांगळा खाईल. भ्रष्टाचारासंबंधित आम्ही लढाई लढत आहोत. मुलुंडचा नागडा पोपटलाल काय करतोय? अंदाज समितीचा अध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा असता तर एव्हाना टणाटणा वाणाटा उड्या मारत धुळ्यात गेला असता. आणि 102 च्या दारात उपोषणाला बसला असता. भुजबळ मंत्रिमंडळात आले, अध्यक्षांसाठी 15 कोटी रुपये जमा झाले, त्या समितीत नावं बघा सगळी महान लोकं आहेत. पण हे पैसे जमा झाले अध्यक्षांसाठी हे आता उघड झाले आहे. पण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करणार? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शहा हे लोक त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणार. आणि विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्याला 100 आणि 500 रुपयांसाठी तु्म्ही आर्थिक गुन्हे शाखेत नोंद करणार. आर्थिक गुन्हे शाखा नोंद घेणार, मग तो तपास ईडीकडे जाणार मग त्यांना अटका होणार. ही 15 कोटी रुपयांची केस ईडीसाठी योग्य केस आहे. हे मनी लॉण्ड्रिंग आहे, हा पैसा आला कुठून? भ्रष्टाचाराच्या मार्गाने केलेली कामं वाचवण्यासाठी हा गुन्हेगारी स्वरुपाचा पैसा आहे. याबाबत मी ईडीला पत्र लिहिणार आहे. ईडीला मनी लॉण्ड्रिंगची व्याख्या कळत नसेल तर मी सांगतो. पण यासाठी सरकारने गुन्हा दाखल केला पाहिजे. ही राज्याची लूट असून हे ठेकेदारांच राज्य आहे. ठेकेदारांना वाचवण्यासाठी राज्य सरकार 15 कोटी रुपये अंदाज समितीचे अध्यक्ष घेतात विधानसभेसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे असे संजय राऊत म्हणाले.
अर्जून खोतकरांची बदनामी करण्याचा मुद्दाच नाही. साडे पाच कोटी रुपये सहज गिळता आले असते तर अगदी सुरळीत पार पडलं असतं. चोरी पकडलेली आहे त्यामुळे बदनामी. चोरी पकडली नसती तर ढेकर दिली असती. 15 कोटींचा व्यवहार हा अंदाज समितीसाठीच होता, हे सगळ्यांना माहित आहे. तुम्ही त्यांची खुली चौकशी करा, पुरावे आपोआप समोर येतील.
पहलगामला एक महिना झाला, पुलवामाला पाच वर्ष होऊन गेली. दोन्ही घटनांमधील नराधम अजूनही मोकळे आहेत. अमित शहा हे हवेत बंदुकीचे बार उडवत आहेत. याला मारलं, त्याला मारलं, ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं, खासदारांचा परदेशात पाठवलं. मूळ प्रश्न हाच आहे की आमच्या 26 भगिनींच कुंकू पुसणारे ते 5-6 भयंकर अतिरेकी कुठे आहेत? त्यांचे एन्काऊंटर नाही, त्यांचा खात्मा नाही. पहलगाम हल्ल्याला एक महिना झाला आपण काय करतोय? अमित शहांनी राजीनामा दिला पाहिजे हे मी वारंवार सांगतोय. त्यांनी प्रायश्चित्त घ्यावं ही आमची भूमिका आहे.
सरकारने ज्या पद्धतीने समितीचे गठन केले आहे ते विरोधी पक्षात फूट पाडण्यासाठी केले आहे. त्यांचा हेतू साफ नाही. त्यांना दहशतवादाविरोधात लढायचं नाहिये. या समितीच्या बहाण्याने ते आजही विरोधी पक्षांत फूट पाडत आहेत असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.