
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे. तसेच असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पदावर बढती देण्याबद्दल कडक टीका केली आहे. ‘जंगली कायदा’ असलेल्या देशात त्यांना ‘राजा’ ही पदवी अधिक योग्य ठरली असती, असा टोलाही लगावला आहे.
हिंदुस्थानशी वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जनरल मुनीर यांना फील्ड मार्शल पद दिले गेले. पाकिस्तानच्या इतिहासात हा सन्मान मिळवणारे ते दुसरे लष्करी अधिकारी ठरले आहेत.
इम्रान खान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले: ‘माशाअल्लाह, जनरल असीम मुनीर यांना फील्ड मार्शल बनवण्यात आले आहे. पण सध्याच्या जंगल कायद्याच्या शासनात ‘राजा’ ही पदवी अधिक साजेशी ठरली असती. जंगलात शेवटी एकच राजा असतो’.
ऑगस्ट 2023 पासून तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांनी त्यांच्या आणि लष्करदरम्यान कोणताही करार झाल्याच्या चर्चांना खोटे ठरवले. ‘ना कोणता करार झालेला आहे, ना कोणतीही चर्चा सुरू आहे. या बातम्या निराधार आणि पूर्णपणे चुकीच्या आहेत’, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, त्यांनी देशाच्या हितासाठी लष्कराला संवादासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. ‘देशावर बाह्य धोके, दहशतवादाची नवीन लाट आणि गंभीर आर्थिक संकटाचे सावट आहे. आपण एकत्र आलो पाहिजे. मी कधीही स्वतःसाठी काहीही मागितले नाही आणि आजही मागत नाही’, असे ते म्हणाले.
हिंदुस्थानकडून पुन्हा कारवाई होऊ शकते असा अंदाज व्यक्त करतानाच खान यांनी पाकिस्तान सरकारला सतर्कतेचा इशारा दिला. ‘सध्याच्या परिस्थितीत लोकशाहीची भावना चिरडली जात आहे. चोरी मोठी असेल तरच मोठं पद मिळतं – असा संदेश दिला जातो, हे न्यायाला गाडणं आहे’, असे म्हणत त्यांनी पाकिस्तान सरकारला लक्ष्य केले आहे.
दरम्यान, आसिफ अली झरदारी यांच्या बहिणीविरोधात दाखल प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एनएबीच्या कारवाईवरही टीका केली. तसेच शाहबाज शरीफ यांच्यावर आरोप असूनही त्यांना पंतप्रधान बनवण्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
खान पुढे म्हणतात की, गेल्या तीन वर्षांत देशाची नैतिक आणि घटनात्मक चौकट कोसळली आहे. ‘तोशाखाना-2 प्रकरणात विनाकारण खटला पुन्हा उघडण्यात आला आहे. तुरुंगात असूनही एकाच कर्नलच्या निर्देशावर न्यायालयीन प्रक्रिया चालते. माझ्या बहिणींना आणि वकिलांना न्यायालयात येण्यास मज्जाव आहे, माझ्या सहकाऱ्यांना भेटण्याची मनाई आहे, मुलांशी संपर्क बंद आहे, पुस्तके दिली जात नाहीत आणि डॉक्टरांशी संवादही बंद आहे. हे कायद्याचे आणि न्यायालयीन आदेशांचे सातत्याने उल्लंघन आहे’, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला.