
>> चैताली कानिटकर ([email protected])
गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये ट्रेकिंग ही आवड जपण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय थ्रील म्हणून व निसर्गरम्य ठिकाणी चांगले फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकण्याची हौस भागवण्यासाठी अनेक जण ट्रेकिंगसोबत जोडले जाऊ लागले आहेत. कारण काहीही असो. यानिमित्ताने निसर्गाच्या जवळ जाण्याची सवय लोकांमध्ये रुजत आहे. मावळतीचा सूर्य, पावसात धबधबे, जैववैविध्याचा अभ्यास करणे, उत्तुंग व बर्फाच्छादित पर्वत न्याहाळणे, स्थानिक लोकांची संस्कृती समजून घेणे हे हेतूही ट्रेकमुळे साध्य होतात. मात्र हे करताना निसर्ग जतन, संवर्धन, रक्षण करणे हे मात्र आपल्याला करायचेच आहे हे विसरून अजिबात चालण्यासारखे नाही.
चला ट्रेकला जायचंय असं जरी म्हटलं तरी रोमारोमात उत्साह संचारतो. आपण आपल्या फिटनेसकडे अधिक लक्ष देऊ लागतो. थोडं थोडं का होईना पहिल्या मोठय़ा ट्रेकपूर्वी कष्ट करू लागतो. मध्यम किंवा मोठय़ा ट्रेकला जाण्याचा मानस असेल तरी चालणे, धावणे, प्राणायाम, योगासन याकडे आपण धाव घेतो. आपण जाणार ती जागा हा एक नावीन्यपूर्ण अनुभव असल्यामुळेच मनात त्या जागेविषयी आपण अनेक कल्पना मांडतो आणि ट्रेकचा दिवस उजाडण्यापूर्वी सुरू होतो काऊंटडाऊन!
ट्रेक म्हणजे फक्त गडकिल्ल्यांची केलेली भटकंती नव्हे, तर डोंगरदऱयांवर केलेले प्रेमही असते. गडकिल्ल्यांवर असलेल्या खाणाखुणा वा इतिहासाची पार्श्वभूमी असेल तर एक वेगळाच आदर मनात दाटून येतो. त्यामुळे कधी एकदा तो क्षण येतोय नि पाठीवर सॅक टाकून चालू पडतोय अशी होणारी तळमळ, रोजच्या रटाळ धावपळीच्या जीवनापासून दूर जाण्यासाठी आसुसलेले ट्रेकरचे मन पहायला मिळते.
ट्रेकचे सोपा, मध्यम आणि कठीण असे तीन प्रकार असतात. सर्वसाधारणपणे एक-दोन दिवसीय ट्रेक्स आपण आपल्या राज्यात करू शकतो. महाराष्ट्रात तर अनेक गडकिल्ल्यांचा खजिना आहे. त्यामुळे विकेंड ट्रेकला अनेक युवक-युवतींचा उत्तम प्रतिसाद मिळतो. राजमाची, हरिश्चंद्रगड, गोरक्षगड, हरिहर, कलावंतीण, कळसुबाई, कर्नाळा अशा अनेक किल्ल्यांवर ट्रेकर्स मनसोक्त भटकंती करतात. पण जिथे घामाच्या धारा, तंगडतोड, तडजोड, निसर्गात सामावून घेणे येतच नाही त्याला ट्रेक म्हणताच येणार नाही. हाडाचा ट्रेकर जोखीम पत्करून मजल दरमजल करत पर्वताच्या माथ्यावर पोहोचून आकाशाला गवसणी घालतोच.
आपल्या देशात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मनाली, कश्मीर येथे अनेक दहा-पंधरा दिवसांचे सुंदर ट्रेक्स आहेत. युथ हॉस्टेल ही सरकारी ट्रेकिंगची संस्था वाजवी दरात अनेक ट्रेक्सचे काटेकोर, शिस्तबद्ध नियोजन करते. तरुण-तरुणी युथ हॉस्टेलच्या साइटवरून बुकिंग आधीच करून ठेवतात. याशिवाय ट्रेक द हिमालयाज् इंडिया हाइक्स, बिकत अॅडव्हेन्चर अशा काही संस्था, तर काही तेथील स्थानिक व ट्रेकिंगचे प्रशिक्षण घेतलेली मंडळी या ट्रेकचे वार्षिक वेळापत्रक सामाजिक माध्यमांवर आधी देतात. त्यामुळेच ट्रेकर्सना दहा ते पंधरा दिवसांचे बुकिंग आधी करून तेथील अविस्मरणीय ट्रेक्सचा अनुभव घेण्यासाठी तयार होता येते. आज अनेक जण ट्रेकला जाताना दिसतात.
काही मंडळी तर वयाच्या पन्नाशीतही ट्रेकिंग करतात. ट्रेक म्हटले की ट्रेक बॅग, ट्रेक शूज,
कॅप, ग्लेअर्स शिवाय विंटर ट्रेक तोही उत्तरेकडचा असेल तर स्वेटर्स, थर्मल्स, ग्लोव्ज व अगदी एप्रिल-मे महिन्यात असेल तर पान्चो, स्टीक, फ्लोटर्स या गोष्टी सोबत ठेवाव्याच लागतात. बॅग पॅक करणे हा मोठा टास्क असतो. तिथेही कपडे, फस्टएड, एनर्जी बार, पावर बँक, सर्वात महत्त्वाचे पाणी या बेसिक गोष्टी ठेवून ट्रेकच्या प्रकारानुसार इतर आवश्यक सामान बरोबर ठेवावे लागते.
एकंदरीत गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये ट्रेकिंग आवड म्हणून जपण्याचे प्रमाण वाढलेच आहे. शिवाय थ्रील म्हणून व निसर्गरम्य ठिकाणी चांगले फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकण्यासाठीची हौस भागवावी म्हणूनही अनेक जण ट्रेकिंगसोबत जोडले जाऊ लागले आहेत. अर्थात कारण काहीही असो. यानिमित्ताने निसर्गाच्या जवळ जाण्याची सवय लोकांमध्ये रुजत आहे.
मावळतीचा सूर्य पाहणे, पावसात धबधबे पाहणे, जैववैविध्याचा अभ्यास करणे, उत्तुंग व बर्फाच्छादित पर्वत न्हाहाळणे, स्थानिक लोकांची संस्कृती समजून घेणे हे हेतूही ट्रेकने साध्य केले आहेत. मात्र हे करताना निसर्ग जतन, संवर्धन, रक्षण करणं हे मात्र आपल्याला करायचेच आहे हे विसरून अजिबात चालणार नाही.
Backpackers Thrilling Trekking Adventures and Nature Exploration