
>> गुरुनाथ तेंडुलकर
गेल्या दोन-तीन लेखांतून आपण स्थितप्रज्ञाची लक्षणं जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. स्थितप्रज्ञ या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. स्थित म्हणजे स्थिरावलेली आणि प्रज्ञा म्हणजे बुद्धी. ज्याची बुद्धी स्थिरावलेली आहे तो स्थितप्रज्ञ इतका सरळ आणि सोपा अर्थ या शब्दातून जाणवतो, पण केवळ अर्थ समजून आपल्याला स्थितप्रज्ञाची नेमकी व्याख्या समजणार नाही आणि नेमकी व्याख्याच जर समजली नाही तर आपण त्या मार्गावरून प्रवास करणे आपल्याला शक्यच होणार नाही. म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या निमित्ताने स्थितप्रज्ञ समजावताना तब्बल अठरा श्लोक वापरले आहेत. त्यातील एकेका श्लोकातून आपण स्थितप्रज्ञ म्हणजे नेमका कोण हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. स्थितप्रज्ञाच्या अवस्थेला पोहोचणे हे भल्याभल्या योग्यांनाही जमले नाही तिथे तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांबद्दल तर न बोललेलेच बरे. तरीही स्थितप्रज्ञाची लक्षणे आपण जाणून घेतली, त्यांचे गुण समजून घेतले आणि त्यातील आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढे जरी अंगीकारले तरीही आपल्या आयुष्यात फार मोठा सकारात्मक बदल घडू शकेल.
भगवद्गीता का वाचायची? जिथे कुठे भगवद्गीतेचे पारायण, पठण, प्रवचन होत असेल अशा ठिकाणी सत्संगाला का जायचे? थोरामोठय़ांच्या गोष्टीच का वाचायच्या? चांगल्याच माणसांच्या संगतीत का राहायचे? असे प्रश्न मला लहानपणी अनेकदा पडायचे. त्यावरून मी आई-वडिलांशी अनेकदा भांडलोही आहे. एकदा माझे वडील मला कोळशाच्या वखारीत घेऊन गेले. तिथे त्यांचे काहीच काम नव्हते. त्यांनी वखारीतल्या तिथल्या माणसांची चौकशी केली. कसल्या कसल्या विषयावर गप्पा मारल्या. साधारण अर्धा तास आम्ही कोळशाच्या वखारीत बसलो होतो. काहीही काम नसताना टाइमपास करायला कोळशाच्या वखारीत नेले म्हणून माझी चिडचिड झाली होती. घरी आल्यानंतर मला जाणवले की, आमच्या दोघांच्याही पांढऱ्या शुभ्र शर्टावर काळ्या-करड्य़ा कोळशाच्या पावडरचे हलके डाग पडले होते. दोघांच्या अंगावर वखारीतील धूळ उडाल्यामुळे काळपट थर जमला होता. मी अधिकच चिडलो. त्यानंतर दोनच दिवसांनी मला वडील महंमद अली रोडवरच्या अत्तराच्या एका मोठय़ा दुकानात घेऊन गेले. त्या दुकानाचा मालक वडिलांच्या ओळखीचा होता. पण तो त्या वेळी तिथे नव्हता. त्याला यायला थोडा वेळ लागणार होता. आम्ही दोघे दुकानात बसलो. अर्ध्या तासाने दुकानाचा मालक आला. त्याच्याशी थोडे बोलून आम्ही बाहेर पडलो आणि घरी परतलो. घरी आल्यानंतर मला जाणवले की, आपल्या अंगाला आणि कपडय़ांना अत्तरांचा संमिश्र सुगंध येतोय.
वडिलांना नेमके काय सांगायचे होते हे माझ्याशी एक शब्दही न बोलता त्यांनी मला समजावले होते आणि मीदेखील पूर्णपणे समजलो होतो. त्या दिवसानंतर मी कधीही त्यांच्याशी उगीच वाद घातला नाही. त्यांनी आणून दिलेली सगळी पुस्तके वाचून काढली. ते ज्या-ज्या कार्यक्रमाला घेऊन जात त्या-त्या कार्यक्रमांना न कंटाळता जाऊ लागलो. त्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे शिवचरित्रकथन होते तसेच परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवारातील प्रवचनही होते. सत्संग का करायचा, चांगल्याशी मैत्री का करायची? चांगली पुस्तके कशासाठी अभ्यासायची? भगवद्गीतेचे अध्ययन केल्याने नेमके काय होते हे मला समजले. मला जे समजले ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. कोळश्याच्या वखारीत बसून काहीही न करता आपले कपडे काळे होतात आणि अत्तराच्या दुकानात जाऊन अत्तर न लावताही फक्त थोडावेळ बसल्यामुळे अंग सुगंधित होते.
स्थितप्रज्ञाची लक्षणे नीट समजून घेतली, त्यावर विचार केला, चिंतन-मनन केले तर काही काळानंतर आपल्यातही ती लक्षणे अल्पांशाने तरी रुजायला सुरुवात होईल. कालांतराने वाढतील. भगवद्गीता अल्पांशाने जरी उमगली तरी आयुष्य उजळून जाईल. आपल्याला आपल्याच वागण्या-बोलण्यात एक अनोखे चैतन्य जाणवू लागेल.
भगवान पुढे म्हणताहेत,
य सर्व अनभिस्नेह तत् तत् प्राप्य शुभाशुभम्।
न अभिनंदति न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता।। 57 ।।
भावार्थ ः जो सर्व गोष्टीत अनासक्त असतो, बरे-वाईट प्रसंग प्राप्त झाले असता त्याबद्दल हर्ष किंवा वाईट वाटून घेत नाही त्याची बुद्धी स्थिर होय. त्याला स्थितप्रज्ञ असे म्हणता येईल. खरेच किती कठीण आहे हे? बऱ्या प्रसंगाने हर्ष मानायचा नाही की वाईट प्रसंगाने खेद करायचा नाही. भगवान म्हणतात की, य सर्वत्र अनभिस्नेह. म्हणजे ज्याला कशाचीच आसक्ती नाही. कोणत्याच गोष्टीबद्दल त्याला स्नेह म्हणजे आसक्ती नाही तो स्थितप्रज्ञ.
आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना सगळ्याच गोष्टींची आसक्ती असते. आपल्याला आयुष्यातील सगळ्याच घटना आपल्या मनाजोग्या घडाव्याशा वाटतात. पण याबद्दल जर थोडा स्थिरबुद्धीने विचार केला, आयुष्यातील सगळ्या घटनांचे नीट विश्लेषण केले तर जाणवेल की, आपल्या आयुष्यात घडणारे प्रसंग हे कोणत्या ना कोणत्या तरी कर्माचे फळ असते. कधी ते कर्म वैयक्तिक असते, तर अनेकदा ते करण्यात आपल्याबरोबर इतरांचाही सहभाग असतो.
उदाहरण द्यायचे झाले तर एखादा शाळकरी विद्यार्थी ज्या वेळी उत्तम गुणांनी उत्तीर्ण होतो, त्या वेळी त्याच्या यशातील मोठा वाटा हा त्याच्या वैयक्तिक मेहनतीचा असतो. परंतु त्याचबरोबर त्याचे शाळेतील शिक्षक, त्याच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारे आई-वडील किंवा घरातील इतर माणसे, त्याच्या जवळचे मित्र अशा अनेकांचा वाटा असतो. पण उत्तम गुणांनी पास झालेला विद्यार्थी ते यश केवळ वैयक्तिक म्हणून मिरवतो. त्याच्याच विरुद्ध म्हणजे तो मुलगा जर अनुत्तीर्ण झाला, तर मात्र त्याच्या अपयशाचे खापर तो अनेकांवर फोडतो. `शाळेत नीट शिकवत नाहीत’ पासून ते `वाईट मुलांच्या संगतीत होता’ पर्यंत आणि `पेपरमध्ये सिलॅबसच्या बाहेरचे प्रश्न विचारले’ पासून ते `आई-वडिलांनी नीट लक्ष दिलं नाही’ पर्यंत. यशाचे श्रेय घ्यायला सगळेच सरसावतात, पण अपयशाच्या बाबतीत मात्र.
भगवान आपल्याला हेच सांगतात की, यशाने हुरळून जाऊ नका किंवा अपयशाने खचूनही जाऊ नका. कर्म करा. केवळ नि:स्वार्थी मनाने कर्म करा. कर्तव्यभावनेने कर्म करा. निर्लिप्त राहून कर्म करा. कर्म करा पण त्याचा कर्ता मी आहे असा अभिमान बाळगू नका. त्या कर्माचा प्रसाद म्हणून यशाचे फळ परमात्मा नक्कीच देईल.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।