
>> गणेश आचवल
काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात की, आपल्या घरातून मिळालेला संगीत कलेचा वारसा सातत्याने पुढे नेत असतात. तबला, ढोलकी, ढोलक अशा अनेक वाद्यांशी दोस्ती करून या वाद्यांच्या वादनात स्वतची ओळख निर्माण करणारे एक वादक म्हणजे सुहास खांडेकर. गेल्या तीस वर्षांपेक्षा अधिक काळ ते या वाद्यवादन क्षेत्रात कार्यरत आहेत.
सुहास खांडेकरांच्या घरातले वातावरणच संगीतमय होते. त्यांचे आजोबा लक्ष्मण खांडेकर हे प्रवचनकार होते, तर वडील पांडुरंग खांडेकर हे तबला आणि पखवाज वाजवायचे. सुहास यांचे तीन काका हेसुद्धा सांप्रदायिक भजनी मंडळात सहभागी असायचे. साहजिकच भजन, अभंग याचे संस्कार सुहास खांडेकरांवर त्यांच्या लहानपणापासूनच झाले. सुहास हे त्यांच्या वडिलांकडून सुरुवातीच्या काळात तबला शिकले. त्यांचे बाबा जेव्हा सांप्रदायिक भजनी मंडळात पखवाज आणि ढोलकी वाजवायला जायचे, तेव्हा सुहासदेखील बाबांसोबत त्यात सहभागी होत होते. तेव्हा भारूड, अभंग, भजन यासाठी सुहास पखवाज आणि ढोलकी वादन करायचे.
सुहास यांचे शालेय शिक्षण मालाड येथील मंगेश विद्यामंदिरमध्ये झाले. शाळेतील अनेक स्पर्धा, स्नेहसंमेलने यात त्यांनी अनेक वेळा वादन केले आहे. तसेच नाटकांना पार्श्वसंगीतदेखील दिले आहे. पुढे तबल्याचे रीतसर प्रशिक्षण सुहास यांनी महाजन सर यांच्याकडून तर ढोलकी या वाद्याचे प्रशिक्षण त्यांनी अनंत पांचाळ यांच्याकडून आणि ढोलक या वाद्याचे प्रशिक्षण त्यांनी बाळकृष्ण धामणकर यांच्याकडून घेतले.
सूरतरंग आणि इतर काही वाद्यवृंदांतून सुहास आपली कला सादर करू लागले. किरण शेंबेकर यांच्या सांगीतिक कार्यक्रमांतून ढोलक आणि कोंगो वादनासाठी सहभागी होण्याची सुहास यांना संधी मिळाली आणि तो त्यांच्या आयुष्यातील टर्निग पॉइंट ठरला. त्या कार्यक्रमांतून अनेक मान्यवर गायकांशी त्यांची ओळख झाली. मुख्य म्हणजे सुप्रसिद्ध गायक जयवंत कुलकर्णी यांच्या कार्यक्रमांतूनदेखील वाद्यसाथ करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांच्या नावाला एक वेगळी ओळख मिळत गेली. सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्रीधर फडके यांच्या कार्यक्रमांतून ते तालवाद्य वादक म्हणून सहभागी झाले. अमित कुमार यांच्या कार्यक्रमांतून ढोलक आणि कोंगो वादनासाठी तसेच गायिका मधुश्री यांच्या कार्यक्रमांतूनही ते आपली कला सादर करत होते.
युधामन्यू गद्रे यांच्या ‘शब्द माझा आरसा तू’ या म्युझिक अल्बमसाठी तालवाद्यांचे संयोजन त्यांनी केले आहे, तर निहार शेंबेकर याने संगीत दिलेल्या ‘गणवेश’ चित्रपटातील गाण्याकरिता ढोलक वादनही त्यांनी केले आहे. किरण शेंबेकर, अजय मदन, प्रदीप कबरे यांच्या कार्यक्रमांतून सातत्याने त्यांचा सहभाग असतो. वाद्यवादनासाठी अनेकदा त्यांनी सिंगापूर, दुबई, आफ्रिका असे परदेश दौरेदेखील केले आहेत. ‘अपना उत्सव’सारख्या कार्यक्रमांतून त्यांनी आपली कला सादर केली आहे.
वादक म्हणून पूर्णवेळ करीअर करताना रियाज ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असते. तसेच विविध सांगीतिक मैफली ठिकठिकाणी होत असतात. प्रत्येक कार्यक्रमाची संकल्पना, त्यातील गाण्यांचे सादरीकरण हे वेगळे असते. त्यामुळे सातत्याने विविध वाद्यवादनाचा रियाज हा करावाच लागतो आणि गाण्यांचा प्रत्येक कार्यक्रम हा एक वेगळा आनंद देत असतो, असे सुहास खांडेकर सांगतात.