
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज जम्मू-कश्मीरच्या पूंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. त्यांनी पीडित कुटुंबांशी तासभर संवाद साधला आणि विचारपूस केली. ‘तुटलेली घरे, विखुरलेले सामान, पाणावलेले डोळे आणि प्रियजन गमावणाऱ्यांच्या वेदनादायक कहाण्या… ही देशभक्त कुटुंबे प्रत्येकवेळी त्यांच्या धैर्याने युद्धाचा सर्वात मोठा भार सहन करतात’, असे राहुल गांधी यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले.
पीडितांशी संवाद साधल्यानंतर राहुल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अनेक लोकांना प्राण गमवावे लागले. पाकिस्तानी सैन्याने थेट नागरिकांना लक्ष्य केले. मी येथील लोकांशी बोललो आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पीडितांनी मला त्यांचा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर मांडण्यास सांगितले जे मी नक्कीच करेन. आम्ही पीडित कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यांनी भयावह स्थिती पाहिली आहे, मात्र सर्व काही ठीक होईल, असे ते म्हणाले.
राहुल गांधी यांच्यासोबत जम्मू-कश्मीरमधील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कर्दा आणि पक्षाचे सरचिटणीस गुलाम अहमद मीर होते. गांधी सकाळी जम्मू-कश्मीर विमानतळावर दाखल झाल्यानंतर गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांची भेट घेण्यासाठी हेलिकॉप्टरने पूंछला रवाना झाले. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एकटय़ा पूंछ जिह्यातील 13 जणांना जीव गमवावा लागला तर 70 हून अधिक जखमी झाले.
नुकसानग्रस्त प्रार्थनास्थळांना भेट
राहुल गांधी यांनी पूंछमधील पाकिस्तानी हल्ल्यांमुळे प्रभावित झालेल्या मंदिर, गुरुद्वारा आणि मदरशांना भेट दिली. त्यांनी ’एक्स’ पोस्टच्या माध्यमातून म्हटले की, येथे प्रत्येक धर्माचे लोक एकत्र राहतात आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सामील होत असतात. हेच पूंछ आहे, हाच हिंदुस्थान आहे, जिथे सद्भाव, एकता आणि देशभक्ती आहे. आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करणारे लोक कधीही यशस्वी होणार नाहीत. आम्ही नेहमीच एकजूट राहू आणि जोरदार प्रत्युत्तर देऊ.