
डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. 15 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर ती गर्भवती राहिल्यानंतर बळजबरीने गर्भपात करून तिला वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले. पोलिसांनी पीडित मुलीची सुटका केली असून याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी नराधम आशुतोष राजपूत अजूनही फरार आहे.
पीडित मुलगी आपल्या आई आणि बहिणीसोबत डोंबिवलीजवळील ग्रामीण भागात राहते. तिच्या आईचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. याच व्यवसायाच्या निमित्ताने आशुतोष राजपूत या मसाले विक्रेत्याचे त्यांच्या घरी येणे-जाणे होते. त्याच ओळखीचा फायदा घेत आशुतोषने अल्पवयीन मुलीशी सलगी वाढवली. दहावीची परीक्षा झाल्यानंतर एका कौटुंबिक वादात पीडित मुलगी घरातून निघून थेट आशुतोषकडे गेली. या संधीचा फायदा घेत त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दोन महिने उलटूनही मुलगी घरी परतली नसल्याने आईने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर सुरू केला. पोलिसांनी डोंबिवलीजवळील एका घरावर छापा टाकून पीडित मुलीची सुटका केली.
जीवे मारण्याची धमकी
मुलीच्या जबाबातून धक्कादायक वास्तव समोर आले. आशुतोषने मुलीचे अपहरण करून एका खोलीत डांबले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात करण्यात आला. त्यानंतर मुस्कान शेख या महिलेच्या घरी तिला डांबण्यात आले. जीवे मारण्याची धमकी देऊन तिथे तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. याप्रकरणी पोलिसांनी मुस्कान शेख, तिचा नवरा आणि अन्य दोन पुरुषांना अटक केली आहे.