
आमच्या विरोधातील खटल्यात साक्षीदार झालास? लय माज आला काय? तू शिंदे गटात का येत नाहीस, शिंदे गटात आला तरच तुला जगू देऊ, नसता खल्लास करून टाकू’ असे म्हणून मिंधे गटाच्या चौघांनी शिवसेना शहर संघटक प्रशांत साळुंखे यांना बेदम मारहाण केली. या घटनेने धाराशीवमध्ये खळबळ उडाली आहे.
प्रशांत साळुंके 23 मे रोजी दुपारी स्कुटीवरून तहसील कार्यालयाकडे निघाले होते. ते संभाजीनगर, काकडे प्लॉट येथील सुधीर बंडगर यांच्या घरासमोर आले असता मिंधे गटाचे कार्यकर्ते सुदर्शन ऊर्फ विशाल गाढवे, विनोद ऊर्फ अमोल जाधव आणि इतर दोन जणांनी त्यांना अडवले. ‘संदेश जाधव याच्यावरील गुन्ह्यात तू साक्षीदार का झालास? अशी विचारणा करत शिवीगाळ व मारहाण केली. साळुंखे यांनी त्यांच्या दादागिरीला जुमानले नाही. त्यावर गाढवे याने लोखंडी रॉडने साळुंके यांच्या पायाच्या गुडघ्यावर मारले. नंतर चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांचा
गळा दाबण्याचा प्रयत्न केला. आनंदनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
























































