
हिंदुस्थानी रेसर कुश मैनीने जगातील सर्वात प्रतिष्ठत अन् कठीण समजल्या जाणाऱया मोनॅको ग्रां.प्रि.मध्ये फॉर्म्युला 2 ची स्प्रिंट रेस जिंकून इतिहास घडविला. ही रेस जिंकणारा तो पहिला हिंदुस्थानी ड्रायव्हर ठरलाय.
डॅम्स लुकास ऑइल टीमसाठी रेस करताना कुशने सुरुवातीपासून शेवटपर्यंत आघाडी कायम राखली आणि शानदार शैलीत विजय मिळवला. हा केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण हिंदुस्थानसाठी अभिमानाचा क्षण ठरला. कुशने कारकीर्दीत पहिली एफ-2 स्प्रिंट रेस जिंकण्याचा पराक्रम केला. तसेच त्यांचा हा पहिलाच पोडियम फिनिशही ठरला. मोनॅकोसारख्या अरुंद आणि आव्हानात्मक रस्त्यांवर 30 लॅप्सपर्यंत त्याने जबरदस्त नियंत्रण राखत या शर्यतीत बाजी मारली.
एफ-2च्या नियमानुसार कुशने फीचर रेससाठी पी-10 वर क्वालिफाय केलं होतं. त्यामुळे त्यांना रिव्हर्स ग्रिडच्या नियमांमुळे शनिवारी झालेल्या स्प्रिंट रेसमध्ये पोल पोजिशन मिळाली. कुशने याचा उत्तम फायदा घेत आत्मविश्वासाने ही रेस जिंकली.
स्वप्न सत्यात उतरलं – कुश मैनी
‘पी-1 मिळवणं आणि मोनॅकोमध्ये विजेतेपद पटकाविणारा पहिला हिंदुस्थानी ड्रायव्हर बनणं, ही माझ्यासाठी भुषणावह बाब होय. स्वप्न अखेर सत्यात उतरलं. मी माझ्या डॅम्स टीमचं आणि सर्व समर्थकांचे मनापासून आभार मानतो. ही फक्त सुरुवात आहे. मला अशा अनेक रेस जिंकायच्या आहेत.’