पोलिसांकडून संशयित आरोपीचा एन्काऊंटर, मोठ्या उद्योजकाच्या घरी दरोडा टाकल्याचा आरोप

छत्रपती संभाजीनगर शहराजवळ असलेल्या एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या दरोडात पुण्यातील आरोपीचा पाठलाग करताना पोलीस व आरोपीमध्ये चकमक उडाली. यावेळी त्या शस्त्रधारी आरोपीने पोलिसांवर फायरिंग केली. यामध्ये पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास वडगाव कोल्हाटी परिसरात घडली. अमोल खोतकर असं मृत आरोपीचं नाव असून तो उद्योजक संतोष लड्डा दरोडा प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याचा संशय होता.

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या वाळूज व एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या महिन्याभरापासून दरोडा तसेच चोरीचे सत्र सुरू आहे. महिनाभरात पडलेल्या दरोड्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या घटनेला आळा बसावा म्हणून पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी गेल्या पंधरा दिवसापासून शहरात महत्त्वाच्या ठिकाणी तसेच शहराला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांवर तगडा बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे शहराला छावणीचे रूप आले.

दरम्यान, एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत बजाज नगर येथे एका उद्योजकाच्या घरी मोठा दरोडा पडला. या दरोड्यात कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे व चांदीचे दागिने दरोडेखोरांनी लंपास केले. या घटनेमुळे पोलीस दल चांगलेच हादरले होते. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांचे सहा ते सात पथक गेल्या आठ ते दहा दिवसांपासून दरोडेखोराच्या मागावर होते. अशातच याच परिसरातील सराईत असलेला आरोपी अमोल खोतकर या गुन्ह्यात समावेश असल्याचा पोलिसांना संशय होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते.

मंगळवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास हा संशयित आरोपी एका ठिकाणी जात होता. यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला हटकले. पण पकडल्या जाण्याच्या भीतीने त्याने पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिसांनी बचावाची काळजी घेत त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात संशयीत आरोपी अमोल खोतकर याचा मृत्यू झाला.

एमआयडीसी पोलीस ठाण्याला आले छावणीचे रूप
एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांवर गोळीबार केल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस, निरीक्षक एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांसह अनेक अधिकाऱ्यांनी एमआयडीसीत धाव घेतली. अधिकाऱ्यांच्या ताफ्यामुळे एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या परिसराला छावणीचे रूप आले होते. दरम्यान पहाटेच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.