
चंद्रपूरमधील मूल तालुक्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी वाघाच्या हल्ल्यात दोन जणांचा बळी गेला आङे. संजीवनी संजय मॅकलवार ( 45) आणि सुरेश मुंगरु सोपानकार (52) अशी मृतांची नावे आहे. मागील महिनाभरात वाघाच्या हल्ल्यात बळी जाण्याची ही अकरावी घटना आहे.
मूल तालुक्यातील भगवानपुर येथील संजीवनी संजय मॅकलवार या सरपनासाठी जंगलात गेल्या असता वाघाने त्य़ांच्यावर हल्ला करून ठार केले. दरम्यान दुसऱ्या घटनेत मूल तालुक्यातीलच कांतापेट येथील सुरेश मुंगरु सोपानकार (52) हे ठार झाले. सुरेश हे चिरोली मार्गावरच्या जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. दुपारी बाराच्या सुमारास बकऱ्यांचा कळपच घरी परतला मात्र सुरेश त्यांच्यासोबत नव्हते. त्यामुळे गावकऱ्यांना संशय आला. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. शोध कार्याअंती सुरेश सोपानकार यांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेल्याचे लक्षात आले.