
पंजाबमधील अमृतसर येथे भीषण स्फोटात संशयित खलिस्तानी दहशतवादी ठार झाला. येथील मजिठा रोड बायपासवरील मोकळ्या जागेतून स्फोटक पदार्थ काढत असताना हा स्फोट झाला. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र त्याचा बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) सारख्या काही दहशतवादी संघटनाशी संबंध असल्याचा संशय आहे. संबंधित संशयित स्फोटक पदार्थ काढण्यासाठी आला असता स्फोटात ठार झाला, असे पोलीस उपमहानिरीक्षक सतींदर सिंग म्हणाले. स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की, मृताचे दोन्ही हात तुटून पडले. स्फोट झाला तेव्हा त्याच्या हातात स्फोटक सामग्री होती. मृताची ओळख पटवली जात असून तो कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता याची चौकशी सुरू आहे. हा स्फोट आयईडी होता की ग्रेनेडचा, याचाही तपास सुरू आहे, असे सिंग यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.