झेडपी शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी माफ

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील पटसंख्या वाढावी, मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत पाठवून त्यांच्यात शिक्षणाची गोडी वाढावी यासाठी साक्री तालुक्यातील मालपूर ग्रामपंचायतीने आगळावेगळा निर्णय घेतला आहे. गावातील जे पालक आपल्या मुला-मुलींना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दाखल करतील त्यांना घरपट्टी आणि पाणीपट्टीत सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मालपूर ग्रामपंचायत केवळ साक्री तालुक्यात नव्हे, तर जिल्हय़ात चर्चेचा विषय झाला आहे. मालपूर ग्रामपंचायतीच्या या निर्णयाबाबत शिक्षण विभागालाही सुखद धक्का बसला आहे.