
समुद्राच्या मधोमध वसलेल्या पलाऊ देशाने आता हिंदुस्थानी नागरिकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. या देशात फिरण्यासाठी आता व्हिसाची गरज लागणार नाही. हिंदुस्थानातील कोणताही नागरिक विना व्हिसा या देशात 30 दिवस म्हणजेच महिनाभर आरामात फिरू शकतो. हिंदुस्थान आणि पलाऊ या दोन देशांमधील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पलाऊ देश हा समुद्री देश म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी रंगीबेरंगी मासे आणि जुनी ऐतिहासिक स्थळे पाहता येऊ शकतात. याआधी फिलिपिन्स देशाने हिंदुस्थानी नागरिकांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री देण्याची घोषणा केली होती. पलाऊ देशानंतर आता जगातील एकूण 58 देश असे आहेत, ज्या ठिकाणी हिंदुस्थानी नागरिक व्हिसाचा वापर न करता थेट जाऊ शकतात. पलाऊ हा एक छोटासा, परंतु सुंदर देश आहे. हा देश प्रशांत महासागरातील मायक्रोनेशिया क्षेत्रात वसलेला आहे. या ठिकाणचा समुद्र अगदी निळाशार अन् शांत आहे. आजूबाजूला घनदाट जंगल आणि स्वच्छ समुद्र पाहण्याचा नजारा काही औरच आहे. पलाऊला जाण्यासाठी मनिला (फिलिपिन्स), तायपेई (तायवान), सियोल (द. कोरिया) शहरांतून फ्लाइट बदलावी लागते.