
येत्या 20 जूनपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचा सराव करण्यासाठी नॉर्थम्प्टन गाठणाऱया के. एल. राहुलने 116 धावांची दमदार खेळी करत हिंदुस्थानने सलामीची चिंता करू नये असा संदेश हिंदुस्थानी संघव्यवस्थापनाला दिला आहे. इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दुसऱया अनधिकृत कसोटीच्या पहिल्या दिवशी हिंदुस्थानने 7 बाद 319 अशी दमदार मजल मारली. खेळ थांबला तेव्हा तनुष कोटियन (5) आणि अंशुल पंबोज (1) खेळत होते. आज हिंदुस्थानचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आणि दुसरीकडे सुरू झालेल्या दुसऱया सराव सामन्यात यशस्वी जैसवाल (17) सलामीला अपयशी ठरला असला तरी राहुलने त्याची भरपाई शतकी खेळीने केली. अभिमन्यू ईश्वरनही (11) लवकर बाद झाला. पण त्यानंतर करुण नायरबरोबर (4) तिसऱया विकेटसाठी 86 धावांची तर ध्रुव जुरेलसह (52) चौथ्या विकेटसाठी 121 धावांची भागी रचत संघाला अडीचशेचा टप्पा गाठून दिला.