
पुणे बाजार समितीत कोणतीही परवानगी नसताना बाजार समितीच्या जागेवर फुकटात दुबार विक्री करणारे बेकायदा डमी आडत्यांवर सभापती, सचिव यांनी केलेल्या कारवाईचा बार फुसका निघाला आहे. बेकायदा आडत्यांचे डमी काही संचालकांच्या आशिर्वादाने आता प्रशासनाला डोळे दाखवू लागले आहेत. बाजारातील लिंबूसह इतर डमींनी लेखी दिल्यानंतरच विक्री बंदबाबत बघू अशी भूमिका डमी आडत्यांनी घेतली आहे. त्यामुळे सभापती, सचिव यांचे कोणही ऐकत नसल्याचे समोर आले आहे.
पुणे बाजार समिताच्या गुलटेकडी मार्केटयार्ड फळबाजार आणि तरकारी विभागात एका गाळ्यावर 5 ते 10 बोगस व्यापारी शेतमालाची दुबार विक्री करीत आहेत. फळे व भाजीपाला विभागात पहिल्या पाकळीत भिंतीच्या कडेला जागेवर बेकायदा दुबार विक्रेत्यांनी कब्जा केला आहे. या दुबार विक्रेत्यांना कोणतीही परवागनी नसून यातून समितीला कोणतेही शुल्क मिळत नसल्याने समितीचे आर्थिक नुकसान होत आहे.
बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर आणि सचिव डॉ.राजाराम धोंडकर यांनी नुकतीच बाजार आवाराला भेट देत भिंतीच्या कडेला बसणारे दुबार विक्रेते आणि बाजारातील दुबार डमी आडत्यांवर कारवाईचा बडगा उचलला. ही कारवाई दररोज सुरू ठेवण्याचे आदेश दिले. मात्र, कारवाई एका दिवसापुरतीच ठरली. आता बाजारातील दुबार डमी विक्रेत्यांनी प्रशासनालाच डोळे दाखवत लेखी पत्र द्यावे मग विक्री बंद करू अशी भुमिका घेतली आहे. त्यामुळे प्रशासन आता काय कारवाई करणार हे पाहणे जरूरीचे ठरणार आहे.
भिंतीकडील जागांच्या भाड्याचा संचालकांना प्रसाद
फळे व भाजीपाला विभागात पहिल्या पाकळीत आडत्यांना गाळ्यासमोर अतिरिक्त शेतमालासाठी जागा दिली आहे. मात्र, भिंतीलगतच्या जागेवर बेकायदा दुबार विक्रेत्यांनी कब्जा केला आहे. भिंतीलगत टेम्पो लावण्यासाठी जागा हवी असताना या ठिकाणी बेकायदा व्यावसाय सुरू आहे.
अतिरिक्त शेतमालासाठी गाळ्यासमोर पंधरा फुटांपर्यंत शेतमाल लावण्यास मुभा दिली आहे. भिंतीलगत व्यावसाय करण्यास परवानगी दिलेली नाही. नियमबाह्य व्यावसायिकांवर कडक कारवाई केली जाईल, असे पुणे बाजार समिती सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी सांगितले.
बाजार समितमध्ये डमी दुबार विक्रेत्यांना कोणतीही जागा दिलेली नाही. बेकायदा व्यवसाय करणार्यांचा माल जप्त करण्याचे आदेश विभाग प्रमुखांना दिले आहेत. यातून समितीचे नुकसान होत आहे. यापुढील काळात व्यवसाय करणार्यांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे, असे पुणे बाजार समिती सभापती दिलीप काळभोर म्हणाले.