इंग्लंडची टी-20 तही सरशी, पराभवाच्या हॅटट्रिकसह विंडीजचा सुपडा साफ

इंग्लंडने वन डे मालिकेनंतर वेस्ट इंडीजचा टी-20 क्रिकेट मालिकेतही पराभव केला. यजमान इंग्लंडने अखेरच्या सामन्यात 37 धावांनी बाजी मारत टी-20 मालिकेत विंडीजचा 3-0 फरकाने सुपडा साफ केला. 84 धावांची आक्रमक खेळी करणारा बेन डकेत ‘सामनावीर’ ठरला, तर जोस बटलरला ‘मालिकावीरा’चा बहुमान मिळाला.

इंग्लंडकडून मिळालेल्या 249 धावांच्या धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा डाव 8 बाद 211 धावसंख्येवरच मर्यादित राहिला. त्यांच्याकडून मधल्या फळीतील रोवमन पॉवेलने 45 चेंडूंत 9 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 79 धावांची खेळी केली. कर्णधार शाई होप 45, सिमरॉन हेटमायर 26, तर जेसन होल्डर 25 यांनी इंग्लिश गोलंदाजीचा प्रतिकार केला, पण ते विंडीजला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत.

त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 3 बाद 248 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. जेमी स्मिथ (60) व बेन डकेट (84) यांनी 53 चेंडूंत 120 धावांची खणखणीत सलामी दिली. त्यानंतर जोस बटलर (22), कर्णधार हॅरी ब्रुक (नाबाद 35) व जेकब बेथेल (नाबाद 36) यांनीही आक्रमक फलंदाजी करीत इंग्लंडला 248 धावसंख्येपर्यंत पोहोचविले.

ब्रुकच्या नेतृत्वाखाली इंग्लंड सुसाट

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडने नवा कर्णधार हॅरी ब्रुकच्या नेतृत्वाखाली सुसाट कामगिरी केली आहे. ब्रुकने 15 दिवसांत इंग्लंडला दोन मालिका जिंकून दिल्या आहेत. जोस बटलरकडून कर्णधारपद स्वीकारल्यानंतर हॅरी ब्रुकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने वेस्ट इंडीजविरुद्धच्या सर्व सहा लढती (तीन वन डे आणि तीन टी-20) जिंकल्या आहेत. आता इंग्लंडचा संघ 20 जूनपासून हिंदुस्थानविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.