
अहिल्यानगर शहरामध्ये शनिवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणी-पाणी झाले. शहरात महानगरपालिकेने वर्षभरापासून रस्त्यांची कामे सुरू केली असून, ती कामे अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, आता नगरकरांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बैठका, चर्चासत्र असे अनेक प्रयोग महानगरपालिकेने रस्त्यांच्या कामाबाबत राबविले आहेत. महानगरपालिका वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करत असल्याचा भास होत आहे. विशेष म्हणजे दिवाळीपूर्वी नाल्याची सफाई करणे अपेक्षित होते. आम्ही शंभर टक्के काम पूर्ण केल्याचा दावा महानगरपालिकेने केला आहे.
वास्तविक पाहता वेळेमध्ये कामे करण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेच्या प्रशासनाची असतानादेखील याकडे दुर्लक्ष झाले आहे, ही वस्तुस्थिती आहे. नगर शहरातील लक्ष्मीबाई कारंजा ते मालेगाव या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या दीड महिन्यांपासून येथे खोदून ठेवले आहेत. मात्र, अद्याप काम झालेले नाही. विशेष म्हणजे कोतवाली पोलीस स्टेशनसमोरही तीन ते चार महिन्यांपासून काम हाती घेतले आहे. या पावसाळ्यामध्ये कोतवाली ठाण्याची भिंतसुद्धा पडली आहे. एवढे होऊनही प्रशासनाला याचे काही सोयरसुतक नाही. फक्त समोर यायचे फोटो काढायचे व काम चालू आहे, असे दाखवायचे असा प्रकार सुरू आहे. एकंदरीत नगर शहराची दयनीय अवस्था आहे.
एकही रस्ता मोठा झाला नाही
दीडशे कोटी रुपयांचे रस्ते करण्यासाठी राज्य शासनाने निधी दिला, असा गवगवा करण्यात आला. वास्तविक पाहता, नगर शहरामध्ये त्या पद्धतीचे दर्जेदार रस्ते अपेक्षित होते. अनेकांना असे वाटले होते की, मोठमोठे रस्ते शहरामध्ये पाहायला मिळतील. मात्र, यातली एकही गोष्ट झाली नाही. फक्त या ठिकाणी सिमेंटचे रस्ते करण्याचा विषय झाला. नव्याने पाईप टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. या व्यतिरिक्त एक इंचही रस्ता मोठा झाला नाही. त्यामुळे सरकारने दिलेल्या पैशांचा योग्य विनियोग झाला की नाही, हे येणारा काळच ठरवेल, असे नागरिक बोलत आहेत.


























































