पत्नीने केली पतीची हत्या

दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या मजुराची हत्या त्याच्या पत्नीनेच केल्याचा व मृतदेह तुकडे करून शोषखड्डय़ात टाकल्याचा धक्कादायक प्रकार मालगोंदे भागात उघड झाला. या प्रकरणी गुन्हे शाखेने पत्नीला अटक केली. न्यायालयाने तिला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी दिली.

मालगोंदा येथील यशवंत ठाकरे (42) गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता होता. याबाबत त्याचे वडील मोहन ठाकरे यांनी 12 जून रोजी सुरगाणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. तो बेपत्ता झाल्यानंतर त्याची पत्नी प्रभावती (36) मजुरी कामासाठी बिलिमोरा येथे गेल्याचे समोर आले. पथकाने तेथे जाऊन सखोल चौकशी केली. यशवंत 13 एप्रिल रोजी मद्यपान करून घरी आला होता. रागाच्या भरात त्याने ताट भिरकावून पत्नीला शिवीगाळ, मारहाण करीत तिचा गळा दाबला. त्या वेळी प्रभावतीने कुऱहाडीने डोक्यावर वार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. आपल्यावर संशय येऊ नये म्हणून तिने मृतदेहाचे तीन तुकडे करून ते गोणीत भरून शौचालयाच्या शोषखड्डय़ात पुरले. वास येवू नये म्हणून त्यावर फवारणीचे औषध टाकले. त्याचे कपडे पेटवून देत कुऱहाड धुऊन पुरावे नष्ट केले. दोन दिवसांनी यशवंतचे वडील घरी आले असता तिने तो कामासाठी गुजरात राज्यात गेल्याचा बनाव केला. पावसाळा सुरू होऊनही मुलगा घरी परतला नसल्याने वडिलांचा संशय बळावला.