घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा कोलमडली, प्रवाशांची अर्धा तास रखडपट्टी

घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा सोमवारी दुपारी विस्कळीत झाली. आझादनगर मेट्रो स्थानकाजवळ शेजारच्या बांधकामातील प्लास्टिकचा तुकडा वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर येत ओव्हरहेड वायरमध्ये अडकला. त्याचा मेट्रोच्या विद्युत पुरवठ्यावर परिणाम होऊन मेट्रोची सेवा अर्धा तास ठप्प झाली. परिणामी, या सर्वच स्थानकांत गर्दी होऊन प्रवाशांची रखडपट्टी झाली. सायंकाळपर्यंत मेट्रो उशिराने धावत होती.

सोमवारी मुंबई शहर व उपनगरांत मुसळधार पावसादरम्यान जोरदार वारे वाहत होते. त्या वाऱ्यामुळे मेट्रो मार्गिकेजवळ बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ठिकाणावरून प्लास्टिक तुकडा उडाला आणि तो मेट्रोच्या ओव्हरहेड वायरवर येऊन अडकला. दुपारी पावणेएकच्या सुमारास आझादनगर मेट्रो स्थानकाजवळ ही घटना घडली. त्याचा मेट्रोच्या विद्युत पुरवठ्यावर परिणाम झाल्याने वर्सोवाच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रो ट्रेन जागोजागी थांबवण्यात आल्या.

प्लॅटफॉर्मची कमी जागा; गर्दी नियंत्रणाची कसरत

घाटकोपर-वर्सोवा मेट्रो मार्ग पश्चिम व पूर्व उपनगराला जोडणारा सोयीस्कर मार्ग ठरत आहे. या मेट्रोची प्रवासी संख्या वाढली आहे. त्यामुळे पीक अवर्सला प्रवाशांना उभे राहण्यासाठी मेट्रोचे प्लॅटफॉर्म अपुरे पडू लागले आहेत. प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची कसरत मेट्रो प्रशासन आणि सुरक्षा रक्षकांना करावी लागत आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.