
1980 च्या दशकापर्यंत एक विश्रांतीचा दिवस धरून कसोटी सहा दिवसांची खेळविली जायची. मात्र एकदिवसीय क्रिकेटच्या जन्मानंतर हळूहळू विश्रांती दिवस कमी करून कसोटी पाच दिवसांवर आणण्यात आली. आता तर कसोटी आणि वन डे क्रिकेटला टी-20 ची वेगवान लागण झाल्यामुळे बहुतांश कसोटी सामने तीन किंवा चार दिवसांतच आटपत आहेत. त्यामुळे आयसीसीने 2027-29 च्या मोसमापासून कसोटी सामने चार दिवसांचे करण्याची तयारी दर्शवली आहे. कसोटी चार दिवसांची झाल्यास छोटय़ा कसोटी संघांमध्ये जास्तीत जास्त कसोटी सामने खेळले जावेत म्हणून या संघांना एकमेकांविरुद्ध चार दिवसांचे सामने खेळता येतील. मात्र हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील महत्त्वपूर्ण मालिकांचे सामने पाच दिवसांचेच असतील. अशा महत्त्वाच्या विषयांवर आयसीसीने परिणामकारक चर्चा केली असून याबाबत लवकरच अंमलबजावणी केली जाणार असल्याचे कळले आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपदात छोटय़ा-छोटय़ा संघांना अधिकाधिक कसोटी मालिका खेळता याव्यात म्हणून आयसीसीने या प्रस्तावाला होकार दर्शविला आहे. 2027-29 च्या कसोटी अजिंक्यपदाच्या हंगामात याची अंमलबजावणी होऊ शकते. कसोटी सामने चार दिवसांचे करण्यात आले असले तरी एका दिवसाला 90 ऐवजी 98 षटकांचा खेळ होणार आहे. मात्र 2025-27 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या स्पर्धेतील सर्व सामने पाच दिवसांचेच असतील, असेही आयसीसीकडून आताच स्पष्ट करण्यात आले आहेत. मात्र छोटय़ा संघाच्या कसोटी मालिकांबाबत आयसीसी लवकरच आपला निर्णय जाहीर करू शकते. काही दिवसांपूर्वी इंग्लंडने आयर्लंडविरुद्ध चार दिवसांचाच कसोटी सामना खेळला होता.




























































