
इंडोनेशियात ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. दिल्लीहून बालीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला पुन्हा दिल्लीला परतावे लागले. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे एअर इंडियाचे म्हणणे आहे. इंडोनेशियाच्या पूर्व भागात मंगळवारी माउंट लेवोटोबी लकी-लकी ज्वालामुखीचा उद्रेक झाला. स्फोट इतका जोरदार होता की, त्यामुळे जवळपासच्या अनेक भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या स्फोटामुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे देखील रद्द करण्यात आली.
एअर इंडियाने म्हटले आहे की, 18 जून रोजी दिल्लीहून बालीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान एआय 2145 ला ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे त्याच्या गंतव्यस्थानावर परतण्याचा सल्ला देण्यात आला होता. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की विमान दिल्लीत सुरक्षितपणे उतरले आहे आणि सर्व प्रवाशांना उतरवण्यात आले आहे.
एअर इंडियाने म्हटले आहे की, विमानातून परतणाऱ्या प्रवाशांच्या सोयी लक्षात ठेवल्या आहेत. त्यांनी सांगितले की प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आणि त्यांनी प्रवाशांना असेही सांगितले की जर त्यांना त्यांची तिकिटे रद्द करायची असतील तर त्यांना त्यांचे पूर्ण पैसे परत मिळतील किंवा त्यांना मोफत रीशेड्युलिंगची सुविधा देखील दिली जाईल.
ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर बाली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 10 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये हिंदुस्थान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि चीनला जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांचा समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून एकामागून एक विमान अपघात होत आहेत. अहमदाबाद विमान अपघातात विमानातील 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. इतकेच नाही तर विमान ज्या ठिकाणी आदळले त्या ठिकाणीही अनेकांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर केदारनाथमध्ये एक हेलिकॉप्टर कोसळले ज्यामध्ये सर्व लोकांचा मृत्यू झाला. हे लक्षात घेऊन आता विमानांच्या उड्डाणांबाबत बरीच खबरदारी घेतली जात आहे.































































