रायगड किल्ल्याकडे जाणारा पर्यायी रस्ता वर्षभरातच वाहून गेला; ठेकेदार मालामाल

निकृष्ट कामामुळे रायगड किल्ल्याकडे जाणारा खर्डी-नेवाळी-हिरकणीवाडी हा पर्यायी रस्ता वर्षभरातच वाहून गेला. रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र थोड्याच काळात या रस्त्याची पुरती वाट लागली असून ठेकेदार मात्र मालामाल झाला आहे. भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता रस्त्याचा आराखडा तयार करण्यात आला होता. चुकीच्या नियोजनामुळे वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्याची नामुष्की सार्वजनिक बांधकाम विभागावर आली आहे. दरम्यान संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाडवासीयांनी केली आहे.

महाड- रायगड या महामार्गाला पर्यायी मार्ग म्हणून रस्ता तयार करण्यात आला होता. नेवाळी गावालगत असलेल्या डोंगर भागातून हा रस्ता गेला आहे. तो अरुंद वळणांचा आणि तीव्र चढ-उताराचा असल्याने मोठ्या वाहनासाठी धोकादायक बनला आहे. गेल्या वर्षभरात चार वेळेस हा रस्ता वाहून गेला. सदोष गटारे आणि मोऱ्या, नित्कृष्ट दर्जाचे रुंदीकरण यामुळे सद्यस्थितीत या रस्त्याची पूर्ण वाताहात झाली आहे. या रस्त्यावरून वाहने चालवणे म्हणजे अपघातांना निमंत्रण देण्यासारखे असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

संपूर्ण रस्ताच कुचकामी आणि निरुपयोगी ठरल्याने भविष्यात हा रस्ता धोकादायकच राहणार आहे. या कामावर खर्च करण्यात आलेला निधी वाया गेला आहे. सार्वजनिक बांधकाम २ विभागाचे कार्यकारी अभियंता व संबंधित विभागाचे अभियंता हे नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे या विभागाची नेमकी भूमिका काय हे अद्यापि समजू शकले नाही.

स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष
खर्डी-नेवाळी-हिरकणी रस्त्याच्या कामादरम्यान नेवाळी घाटात तीव्र वळण असल्याने पर्यायी मार्ग सुचवला होता. मात्र बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराचे हित साधण्यासाठी त्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या रस्त्याचा आराखडा तयार करताना तसेच कामादरम्यान येणाऱ्या संभाव्य त्रुटींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.