विमा पॉलिसीच्या नावाखाली सव्वा दोन कोटींची फसवणूक

विमा पॉलिसीच्या नावाखाली ठगाने वृद्धाची सव्वा दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. घडल्या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्याने स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या नावाने सात विमा पॉलिसी काढल्या होत्या. त्या पॉलिसीचे त्याने अनेक वर्ष हप्ते भरले होते. मात्र कालांतराने काही कारणास्तव त्याने भरले नव्हते. हप्ते न भरल्याने त्याची पॉलिसी रद्द झाली होती. पॉलिसी सुरू करण्यासाठी ते प्रयत्न करत होते. त्याच दरम्यान त्याना एकाने फोन केला. त्याने तो विमा नियामक व विकास प्राधिकरण येथून बोलत असल्याचे भासवले.

पॉलिसीचे पैसे मिळवून देण्यासाठी मदत करतो अशा त्याना भूलथापा मारल्या. विश्वास बसावा म्हणून ठगाने त्याना स्वतःचे ओळखपत्र पाठवले. पॉलिसीचे 49 हजार रुपये सर्व्हिस चार्ज म्हणून द्यावा लागेल असे सांगून त्याच्याकडून तपशील घेतला. त्यानंतर सात पॉलिसीचे 24 लाख रुपये मिळतील अशा भूलथापा मारल्या. त्या 24 लाखासाठी सहा लाख रुपये कर भरावा लागेल असे सांगितले.

कर भरण्याची तयारी दाखवल्यानंतर आणखी चार जणांनी त्याना फोन केला. फोनवर वेगवेगळी कारणे सांगून त्याच्याकडून 2 कोटी 36 लाख रुपये घेतले. पैसे भरल्यानंतर त्याने पॉलिसीबाबत विचारले असता फसवणुकीचा प्रकार समोर आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याना धक्काच बसला. घडल्या प्रकरणी त्याने मध्य सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.