सोने तस्करी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कस्टमकडून अटक

सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना सीमा शुल्क विभागाने अटक केली. खुशी लाल यादव आणि मोहमद अमीर डॉक्टर अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे चार कोटी 24 लाख 96 हजार रुपये इतकी आहे. घडल्या प्रकरणी त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीचे प्रकार होऊ नयेत याची खबरदारी घेतली आहे. आज सकाळी सीमा शुल्क विभागाने विमानतळावर सापळा रचला. त्यानंतर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी खुशीलाल यादवला ताब्यात घेतले. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याची झडती घेतली. त्याच्याकडून सहा कॅप्सूल जप्त केल्या. त्या कॅप्सूलमध्ये सोन्याची पावडर होती. त्याने त्या कॅप्सूल ट्राउसरमध्ये लपवल्या होत्या. त्याच्याकडून जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे 2 कोटी 81 लाख रुपये इतकी आहे. तो एका प्रवाशाकडे ते सोने देणार होता. तसेच दुसरी कारवाई आज सकाळी केली. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने डिपार्चर विभागात सापळा रचला. तेव्हा सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मोहमदच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून चार कॅप्सूल जप्त केल्या. जप्त केलेल्या कॅप्सूलमधील सोन्याची किंमत 1 कोटी 43 लाख रुपये इतकी आहे.

11 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बँकॉक येथून हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करण्याचा प्रयत्न सीमा शुल्क विभागाने हाणून पाडला. सीमा शुल्क विभागाने कारवाई करून सुमारे 11 कोटी 88 लाखांचा गांजा जप्त केला. तो गांजा उशीच्या कव्हरमध्ये लपवला होता. या प्रकरणी दोघांना सीमा शुल्क विभागाने ताब्यात घेऊन अटक केली.

पोटातून काढले 11 कोटीचे कोकेन

कोकेनची तस्करी करणाऱ्या आयवोरी देशाच्या नागरिकाला सीमा शुल्क विभागाने अटक केली. त्याने कोकेन असलेल्या कॅप्सूल गिळल्या होत्या. त्यामुळे त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्या पोटातून 67 कोकेनच्या कॅप्सूल काढल्या. जप्त केलेल्या कोकेनची किंमत सुमारे 11 कोटी रुपये इतकी आहे. अने चार्लेस जोसेलीन कौमे असे त्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा करून त्याला अटक केली.