भरधाव एसटीची रिक्षाला धडक; महिला ठार,अर्नाळ्यात भीषण अपघात

आगाशीहून अर्नाळ्याकडे जाणाऱ्या रिक्षेला भरधाव एसटीने धडक दिल्याची घटना आज सकाळी नऊच्या सुमारास अर्नाळ्यात घडली. ही धडक इतकी भयंकर होती की यात रिक्षेतील एका महिलेचा मृत्यू झाला. कविता कोलगे असे मृत महिलेचे नाव असून ती जुना कोळीवाडा येथे राहत होती. तर तीन महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महिला रिक्षाचालक पूनम वरठा या कविता कोलगे, मीनाक्षी पाटील आणि शिल्पा राऊत यांना घेऊन आगाशीहून अर्नाळ्याला जात होत्या. गाडी लक्ष्मण सोसायटीजवळ पोहोचली. याचवेळी अर्नाळा शिर्डी एसटी विरुद्ध दिशेने भरधाव आली आणि बसने रिक्षाला जोरदार धडक दिली. क्षणभर काय झाले हे कोणालाच समजले नाही. मात्र या धडकेत रिक्षाचा चक्काचूर झाला. एसटीच्या धडकेत रिक्षातील महिला कविता कोलगे यांचा जागीच मृत्यू झाला असून मीनाक्षी पाटील या गंभीर जखमी झाल्या. इतर दोघींना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चालक फरार
अपघात झाल्यानंतर एसटी चालक राजू गांगुर्डे हा घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी पूनम वरठा यांनी दिलेल्या तक्रारीवरून अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस एसटीचालकाचा शोध घेत आहेत. अपघातानंतर काहीकाळ वाहतूककोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच अर्नाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.