परळमध्ये ‘आपला दवाखाना’साठी तिसऱ्या वर्षीही परवानगी नाकारली, गैरसोय दूर केली नाही तर शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे मुंबई महापालिकेने प्रत्येक प्रभागात ‘आपला दवाखाना’ ही वैद्यकीय सेवासुविधा सुरू केली आहे. मात्र, परळमध्ये प्रभाग क्रमांक 202 मध्ये एकही आपला दवाखाना नाही. जेरबाई वाडिया मार्गाजवळ असलेल्या भागात 20 हजारांची नागरी वस्ती असून त्यात सर्वसामान्य राहतात. त्यांना आपला दवाखानाची सेवा मिळाल्यास केईएम रुग्णालयावरील ताणही कमी होणार आहे. एफ-दक्षिण विभाग आणि पालिका आयुक्तांकडे गेली तीन वर्षे सातत्याने मागणी करूनही दवाखाना सुरू केलेला नाही. याबाबत तातडीने कार्यवाही करून आपला दवाखाना सुरू करावा, नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा विभाग संघटक माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी पालिका आयुक्तांना दिला आहे.

परळ येथील मातोश्री गृहनिर्माण संस्था जेरबाई वाडिया मार्ग येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू करावा, यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, परळमधील या जागेवर पदपथ आहे आणि त्यांचा वापर स्थानिक नागरिक करत आहेत, अशी खोटी माहिती काही संस्थांनी पालिकेला दिली आहे.

ही जागा गेली 35 वर्षे इंडियन कॅन्सर सोसायटीच्या ताब्यात असून अद्याप त्या जागेवर कोणतीही सुविधा उभारण्यात आलेली नाही. त्याचबरोबर ही जागा सुशोभीकरण करण्याकरिता दिली होती. मात्र, अद्याप तेथे सुशोभीकरण करण्यात आले नसून तेथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. आयुक्तांनी आडमुठेपणा सोडून दवाखाना सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी केली आहे.