
सुरक्षेच्या दृष्टीने शाळा आणि महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात विध्यार्थ्यांना मादक पेय, तंबाखू, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास कायद्याने मनाई असताना अनेक पानटपरी चालक या नियम धाब्यावर बसवत सरासपणे हे पदार्थ विकत आहेत. अशा प्रकारे बेकायदेशीर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या टपरी चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी एन विभागाचे साहाय्यक आयुक्त आणि साहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडे महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेनेने चे अध्यक्ष संजय नटे यांनी केली.
घाटकोपरमध्ये काही पानटपरी चालक कायद्याचे उल्लंघन करताना आढळतात. त्यामुळे मुले व्यसनी बनून त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्धवस्त होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा पानटपऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेनेचे मार्गदर्शक शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूचनेनुसार अध्यक्ष संजय नटे यांनी वॉर्ड अधिकारी आणि पोलीस साहाय्यक आयुक्तांकडे केली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य सचिव सचिन भांगे, संघटक प्रकाश वाणी, घाटकोपर पूर्व विधानसभा संघटक प्रसाद कामतेकर, शिक्षकेतर सेनेचे विधानसभा संघटक प्रशांत निर्भवणे, उपविभाग संघटक प्रदीप सकपाळ, शाखा संघटक चंद्रकांत हळदणकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.