सर्व लोकल 15 डब्यांच्या करा! डबेवाल्यांची शासनाकडे मागणी

लोकल ट्रेनला स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाने डबेवाल्यांची चिंता वाढली आहे. स्वयंचलित दरवाजांमुळे ट्रेनमधून जेवणाच्या डब्यांची ने-आण करताना गैरसोय होईल. त्यामुळे स्वयंचलित दरवाजाच्या पर्यायाचा पुनर्विचार करा आणि त्याऐवजी सर्व लोकल ट्रेन 15 डब्यांच्या करा, अशी मागणी डबेवाल्यांनी केली आहे. मुंब्रा येथे लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. त्या घटनेनंतर रेल्वे मंडळ व राज्य सरकारने सर्वच लोकल ट्रेनना स्वयंचलित दरवाजे बसवणार असल्याची घोषणा केली. मात्र हा पर्याय व्यवहार्य ठरणार नसल्याचे मत प्रवासी तसेच तज्ञांनी व्यक्त केले.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्वयंचलित दरवाजाचा पर्याय योग्य आहे; मात्र लोकल सेवेचा एक अविभाज्य भाग असणाऱ्या डबेवाल्यांच्या गैरसोयीचा विचार रेल्वे प्रशासनाने केला पाहिजे. ‘पीक अवर्स’ला लोकल ट्रेनच्या सामान डब्यात काही क्षणांत जेवणाचे डबे चढवणे-उतरवणे यात कसरत करावी लागते. स्वयंचलित दरवाजांमुळे डबे चढवण्यात वेळ लागला तर इतर प्रवाशांना त्याचा त्रास होईल, अशी प्रतिक्रिया डबेवाला संघटनेचे प्रवत्ते विष्णू काळडोके यांनी दिली. उपनगरीय रेल्वे मार्गावर दररोज 1200 डबेवाले नोकरदार मंडळींना जेवणाचे डबे पोहोचवण्याचे काम करतात.