…हे सरकार अदानी आणि निवडणूक आयोगाचे, आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला

वरळीतील सावली इमारतीमधील सरकारी कर्मचाऱ्यांना बीडीडी चाळ पुनर्विकासात 500 चौरस फुटांची घरे देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. मात्र देवेंद्र फडणवीस सरकारने तो गुपचूप मागे घेतला. हे सरकार मराठी माणसाचे नक्कीच नाही, महाराष्ट्राचेही नाही… हे सरकार अदानी आणि निवडणूक आयोगाचे आहे, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. महाराष्ट्राची अनेक वर्ष सेवा करणाऱया शासकीय कर्मचाऱयांच्या ‘सावली’ इमारतीला भाजप सरकारची ‘सावली’ नाही, पण अदानी समुहाला मात्र मुंबईत 1600 एकर भूखंडासोबत अनेक ‘सवलती’ दिल्या जाताहेत. असे आदित्य ठाकरे यांनी त्यात म्हटले आहे.

पोलिसांना तरी घरे देणार का?

सावलीचा जीआर सरकारने मागे घेतला. आता वरळी, एन.एम. जोशी मार्ग आणि वडाळा बी.डी.डी. चाळीत राहणाऱया पोलीस परिवारांचा प्रश्न आहे. त्यांना तरी हे सरकार घरे देणार आहे का? की इथेही जुमलाच करणार? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
भाजपला मुंबईचे

‘अदानीनगर’ करायचेय!

धारावी पुनर्विकासासंदर्भात जाहीर झालेल्या पहिल्या यादीत 75 टक्के धारावीकरांना अपात्र ठरवण्यात आले असून त्यावरून आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला. आम्ही सुरुवातीपासून हाच प्रश्न विचारतोय, की अदानी समूह नेमका कुणाचा विकास करतंय? धारावीकरांचा की स्वतःचा? असे नमूद करतानाच ‘कदाचित मुंबईचं नाव ‘अदानीनगर’ करण्याचा भाजपचा विचार आहे,’ असे टीकास्त्र आदित्य ठाकरे यांनी सोडले.