
नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून नगरमार्गे पंढरपूरकडे निघालेल्या संत निवृत्ती महाराज पालखी सोहळ्यातील वृद्ध वारकर्याला भरधाव दुचाकीने धडक दिली. यामध्ये वारकर्याचा मृत्यू झाला. नगर-सोलापूर महामार्गावर दहीगाव परिसरात मंगळवारी (दि. २४) रात्री हा अपघात झाला.
दत्तू किसन उगले (वय ६५, रा. लोखंडेवाडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक) असे मृत्यू झालेल्या वारकर्याचे नाव आहे. मयत दतू उगले हे पत्नीसोबत संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीत आले होते.दिंडीने नगर शहरातील मुक्कामानंतर पालखी २४ जून रोजी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. रात्री या दिंडीचा मुक्काम साकत गावात होता.दिंडीतील सर्व वारकर्यांचे रात्री जेवण झाल्यानंतर उगले पती-पत्नी हे दहीगाव येथे परिचिताच्या घरी पायी निघाले होते. दहीगावच्या राम मंदिरासमोर महामार्ग ओलांडत असताना भरधाव दुचाकीस्वाराने उगले यांना धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच दिंडीतील व्यवस्थापक साहिल मुथाळ तसेच ह.भ.प. चेतन महाराज नागरे यांच्यासह नागरिकांनी त्यांना नगर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मयत घोषित केले. मयत वारकरी उगले हे गेल्या अनेक वर्षांपासून संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या दिंडीत सहभागी होत होते. उगले यांच्या मृत्यूने वारकर्यांमध्ये शोककळा पसरली आहे.